सोलापूर – श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीतील बेदाणा लिलावात यंदा दराचा ‘गोडवा’ पूर्णपणे ओसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. गुरुवारी झालेल्या लिलावात तब्बल १५६ टन (१० हजार ४२८ बॉक्स) बेदाण्याची आवक झाली. मात्र वाढलेल्या पुरवठ्यामुळे बाजारभावावर दबाव निर्माण झाला असून, सरासरी दर केवळ २२५ रुपये प्रतिकिलोवर येऊन ठेपल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
दरम्यान, या मंदीच्या वातावरणातही दर्जेदार उत्पादनाला बाजाराने योग्य प्रतिसाद दिला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथील प्रयोगशील शेतकरी गंगाधर प्रफुल्ल बिराजदार यांच्या उत्कृष्ट दर्जाच्या ७२ बॉक्स बेदाण्याला प्रतिकिलो ३७६ रुपयांचा सर्वोच्च दर मिळाला. सांगली येथील व्यापाऱ्यांनी हा बेदाणा खरेदी केला. विशेष म्हणजे, बिराजदार यांना २०२४ सालचा राज्य शासनाचा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ मिळाला असून, दर्जेदार उत्पादनामुळे त्यांनी पुन्हा एकदा बाजारात आपली छाप पाडली आहे.
चौकट
लिलावात किमान १०० रुपये, सरासरी २२५ रुपये आणि उत्कृष्ट दर्जाच्या बेदाण्याला कमाल ३७६ रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला. एकूण आवकीपैकी सुमारे १०१ टन बेदाण्याची विक्री झाली, तर ५५ टन (३ हजार ६५० बॉक्स) बेदाणा विक्रीसाठी शिल्लक राहिला. त्यामुळे पुढील लिलावातही दरावर दबाव कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चौकट
सोलापूर जिल्ह्यासह दक्षिण सोलापूर, पंढरपूर परिसर आणि कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर बेदाण्याची आवक होत आहे. वाढती आवक आणि मर्यादित मागणी यामुळे दरात घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.