जालना : जिल्ह्यात गौण खनिजाच्या अवैध उत्खनन, वाहतूक आणि साठवणुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांनी गुरुवारी (11 जून) मध्यरात्री अंबड तालुक्यातील गोंदी परिसराला अचानक भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीदरम्यान अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीसंदर्भातील हालचालींचा आढावा घेण्यात आला. तसेच महसूल, पोलीस, परिवहन आणि इतर संबंधित विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या कारवायांची माहिती घेण्यात आली. अवैध खनिज उत्खनन रोखण्यासाठी विविध विभागांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून संयुक्तरीत्या कारवाई करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना संवेदनशील भागांमध्ये नियमित गस्त वाढविण्याचे निर्देश दिले. तसेच संयुक्त तपासणी मोहिमा आणि अचानक पाहणी मोहिमांना अधिक गती देऊन अवैध उत्खनन व वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यावर भर देण्यात आला. जिल्ह्यातील सर्व विभागांनी अधिक दक्षता बाळगत अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सक्रियपणे काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात गौण खनिजाच्या अवैध उत्खनन, वाहतूक आणि साठवणुकीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अशा प्रकरणांतील प्रत्येक हालचालीवर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक स्वतः लक्ष ठेवून आहेत. अवैध उत्खनन आणि वाहतुकीत सहभागी आढळणाऱ्या व्यक्ती, वाहनमालक तसेच संबंधित घटकांविरुद्ध प्रचलित कायदे व नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, कोणत्याही व्यक्तीने अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक अथवा साठवणुकीच्या प्रकारांमध्ये सहभागी होऊ नये. अन्यथा संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यात नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाची कारवाई पुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाच्या या अचानक पाहणीमुळे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या घटकांमध्ये खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील अवैध खनिज व्यवसायावर अंकुश आणण्यासाठी प्रशासनाने मोहीम अधिक व्यापक करण्याचे संकेत दिले आहेत.















