सोलापूर – केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘हर घर जल’ संकल्पनेला सोलापूर जिल्ह्यात निधीअभावी खीळ बसली आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अनेक पाणीपुरवठा योजनांची कामे रखडली असून, थकीत देयके न मिळाल्याने ठेकेदारांनी कामे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी शेकडो गावांतील नागरिकांना अद्यापही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या एक हजार नऊ योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी चारशेहून अधिक गावांतील कामे पूर्ण होऊन घराघरांत नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मात्र उर्वरित योजनांना निधीअभावी ब्रेक लागला आहे. शासनाकडे तब्बल ६४ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असली तरी अद्याप निधी उपलब्ध झालेला नाही.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सध्या २६५ बिलांचे प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. थकीत रक्कम न मिळाल्यामुळे अनेक ठेकेदारांनी कामे मंदावली किंवा पूर्णपणे बंद केली आहेत. कामे रखडल्याने अनेक गावांतील जलजीवन मिशनची उद्दिष्टे अपूर्ण राहिली असून ग्रामस्थांना विहिरी, हातपंप आणि टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी विभागाकडून संबंधित ठेकेदारांना वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र निधीअभावी कामांचा वेग वाढत नसल्याने प्रशासनापुढेही मोठे आव्हान उभे राहिले आहे.
चौकट
जलजीवन मिशनची सद्यस्थिती
मंजूर योजना : १,००९
पूर्ण झालेली गावे : ४०० पेक्षा अधिक
प्रलंबित बिले : २६५
शासनाकडे निधी मागणी : ६४ कोटी रुपये
अनेक ठिकाणी कामे ठप्प
चौकट
“नळजोडणी घरापर्यंत पोहोचली, पण पाणी अजूनही दूरच”
जलजीवन मिशनच्या यशस्वी दाव्यांमागील वास्तव अधोरेखित करणारी ही परिस्थिती ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणत आहे. निधी वेळेत उपलब्ध न झाल्यास आगामी उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये पाणीपुरवठ्याचे संकट अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Post Views: 13