सोलापूर – पाच वर्षांखालील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी सोलापूर जिल्ह्यात येत्या २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ग्रामीण, शहरी आणि स्थलांतरित वस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुमारे ४ लाख ३६ हजार ५७२ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
विशेष बाब म्हणजे बसस्थानके, रेल्वे स्थानके, बाजारपेठा, विटभट्ट्या, साखर कारखाने, यात्रा स्थळे आणि लग्न समारंभांमध्येही पोलिओ डोस पाजण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भटक्या वसाहती, स्थलांतरित कुटुंबे आणि ऊसतोड कामगारांच्या वस्त्यांमधील बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोबाईल पथके कार्यरत राहणार आहेत.
पोलिओमुक्त भारताचे यश कायम राखण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाच वर्षांखालील बालकांना जवळच्या पोलिओ बूथवर घेऊन जावे आणि पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. मोहिमेच्या यशासाठी ग्रामस्तरावर जनजागृती मोहीम, प्रभातफेरी, प्रचार-प्रसिद्धी आणि विविध विभागांमधील समन्वयावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
चौकट
पर्यवेक्षकांकडून मोहिमेवर बारकाईने देखरेख
मोहिमेसाठी ग्रामीण भागात ५ हजार ५७०, शहरी भागात ५७० आणि महानगरपालिका क्षेत्रात ३७३ लसीकरण बूथ उभारण्यात आले आहेत. लसीकरणासाठी ७ हजार २२२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा व तालुकास्तरीय पर्यवेक्षकांकडून मोहिमेवर बारकाईने देखरेख ठेवली जाणार आहे.
Post Views: 41