जेऊर – वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध कृषी पुरस्कारांचे वितरण बुधवार दि.१ जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधून मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे करण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या १८ व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यामध्ये करमाळा तालुक्यातील राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीला कृषी निर्यात पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व ३५ हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई ,राज्यमंत्री इंद्रनील नाईक,प्रतिष्ठानचे सचिव दीपक पाटील, अध्यक्ष डॉ. राजेंद्र बारवाले, कार्याध्यक्ष अविनाश नाईक, डॉ. बकुल पटेल, माजी आमदार मुश्ताक अंतुले, मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत तुळवे या मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चौकट –
कंपनीच्या यशस्वी वाटचालीवर प्रतिष्ठित पुरस्काराची मोहोर…
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील ७५६ सक्रिय शेतकऱ्यांना एकत्र आणून ३३ लाख रुपयांच्या भागभांडवलासह ५ कोटींहून अधिक उलाढालीचा टप्पा राजे रावरंभा शेतकरी कंपनीने गाठला आहे. नाबार्ड व कृषी विभागाच्या १०,००० FPO प्रकल्पांतर्गत स्थापित झालेल्या या कंपनीने पहिल्याच वर्षी (डिसेंबर २०२२) पाणि फाउंडेशनच्या सहकार्याने दुबई येथे केळीचा कंटेनर यशस्वीपणे निर्यात केला. या ऐतिहासिक कृषी निर्यात कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने १५ ऑगस्ट २०२३ रोजी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरील ध्वजारोहणासाठी कंपनी अध्यक्षांना विशेष निमंत्रित केले होते. केळीची जागतिक पुरवठा साखळी बळ कट करण्यासाठी कंपनीने विप्रो, ट्रायडेंट आणि एस. के. सारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय निर्यातदार कंपन्यांशी थेट व्यावसायिक करार केले आहेत.
कंपनीने वॉटर च्या धोरणात्मक सहकार्यातून करमाळा कुडूवाडी रोडवरील स्वतःच्या १ एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाची आधुनिक काढणीपश्चात साखळी यंत्रणा उभारली आहे. यामध्ये केळीची ‘शेल्फ लाईफ’ वाढवण्यासाठी आणि शीतसाखळी राखण्यासाठी बायोमास संचलित कोल्ड स्टोरेज व पॅक हाऊसची निर्मिती करण्यात आली आहे. अचूक पीक नियोजन, काढणी व्यवस्थापन आणि रोगराईच्या अंदाजासाठी येथे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित हवामान केंद्र) आणि ६० टन क्षमतेचा वजन काटा कार्यान्वित आहे. याशिवाय, शेतीमधील काढणीपश्चात होणारे नुकसान कमी करण्यासाठी ड्रोन आणि आधुनिक अवजारे बँक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.या कामगिरीची दखल वसंतराव नाईक प्रतिष्ठान पुरस्कार वितरण समितीने घेतली. कोणताही प्रस्ताव न मागवता हा पुरस्कार देऊन कंपनीच्या यशस्वी वाटचालीवर प्रतिष्ठानने मोहोर उमटवली.