सोलापूर – शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी शारीरिक शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सक्षम समाज व बलशाली राष्ट्रनिर्मितीसह ऑलिम्पिक पदकांचा पाया रचण्यात या विषयाचे योगदान मोठे आहे. मात्र, २०१७ पासून राज्यातील शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदभरतीकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे हजारो बी.पी.एड. आणि एम.पी.एड. (M.P.Ed.) पदवीधर आजही बेरोजगार आहेत.
या दीर्घकालीन अन्यायाविरोधात ‘महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने’ थेट लढाईचा बिगुल फुंकला असून, बुधवार ८ जुलैपासून आझाद मैदान , मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन जाहीर केले आहे. या बेमुदत धरणे आंदोलनामध्ये राज्यातील सर्व पात्रताधारक शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे मार्गदर्शक प्रदुम्न जोशी, कैलास माने, विश्वनाथ पाटोळे, अमोल जोशी, राज्याध्यक्ष संदीप मनोरे, राज्य सचिव तायाप्पा शेंडगे व सर्व राज्य कोअर कमिटी सदस्य, विभागीय तसेच जिल्हास्तरावरील सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
प्रमुख मागण्या:
१) क्रीडा शिक्षकांची सेवा प्रवेश नियमावली व सेवा शर्ती तात्काळ जाहीर करून भरती प्रक्रिया सुरू करा
२) २ जानेवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार मंजूर झालेली ४,८६० क्रीडा शिक्षकांची सर्व पदे (१००%) पवित्र पोर्टल भरतीच्या पहिल्याच टप्प्यात भरा
३) १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार रिक्त होणाऱ्या शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदांवर इतर विषय शिक्षकांचे समायोजन न करता, ती पदे केवळ पवित्र पोर्टलमार्फतच भरा
४) जिल्हा परिषद केंद्रशाळा, माध्यमिक शाळा, महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय आश्रमशाळा तसेच समाजकल्याण विभागाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व रिक्त पदे पवित्र पोर्टलमार्फत भरून भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करा.


















