सोलापूर – शहरातील वर्ग-२ (बी-२) मिळकत धारकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवार, ६ जुलै रोजी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. महसूल मंत्र्यांच्या अधिकृत दौरा कार्यक्रमात या बैठकीचा समावेश करण्यात आला असून, त्यामुळे हजारो मिळकतधारकांच्या अपेक्षा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत.
महसूल मंत्र्यांच्या अधिकृत कार्यक्रमानुसार सायंकाळी ६.२५ वाजता मुंबईतील विस्तार मंत्रालयाच्या कक्ष क्रमांक १०५ येथे ही बैठक होणार आहे. सोलापूर शहरातील वर्ग-२ (बी-२) सनद प्रकारच्या मिळकतींशी संबंधित अडचणी, मालकी हक्क, व्यवहार आणि नियमितीकरणाच्या प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती कार्यक्रम पत्रिकेत नमूद करण्यात आली आहे.
या बैठकीचे विशेष महत्त्व म्हणजे आमदार देवेंद्र कोठे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर हा विषय थेट महसूल मंत्र्यांसमोर येत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रशासकीय स्तरावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोलापूर शहरात वर्ग-२ मिळकतींच्या व्यवहारांवर अनेक वर्षांपासून विविध कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांना मालमत्तेची खरेदी-विक्री, बँक कर्ज, वारस नोंद तसेच इतर महसुली कामांमध्ये अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकीकडे नागरिक, बांधकाम व्यावसायिक आणि संबंधित मिळकतधारकांचे लक्ष लागले आहे.
चौकट
बैठकीत या प्रश्नांवर ठोस निर्णय किंवा पुढील कार्यवाहीबाबत स्पष्ट दिशा मिळाल्यास सोलापूर शहरातील हजारो वर्ग-२ मिळकतधारकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रशासकीय पातळीवर या बैठकीतून सकारात्मक मार्ग निघतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post Views: 18