सोलापूर – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील वारकऱ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पालखी मार्गावरील ८१ ग्रामपंचायतींना तब्बल ३ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून, या निधीच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उभारण्याच्या कामांना गती मिळणार आहे.
आषाढी वारीदरम्यान लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असल्याने पालखी मार्गावरील गावांवर मोठा ताण येतो. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, तात्पुरती शौचालये, आरोग्यविषयक सुविधा, कचरा व्यवस्थापन तसेच वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने विशेष निधी मंजूर केला आहे.
ग्रामपंचायतींच्या गरजेनुसार व क्षमतेनुसार दोन लाखांपासून २५ लाख रुपयांपर्यंत निधी देण्यात आला आहे. त्यामुळे विविध गावांमध्ये वारकऱ्यांसाठी सुविधा उभारण्याची कामे सुरू झाली असून, वारीदरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे.
यंदाच्या वारीत मानाच्या पालख्यांसह इतर पालख्यांचेही आगमन मोठ्या प्रमाणात होणार असल्याने पालखी मार्गावरील गावांमध्ये स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधा-संपन्न वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींच्या समन्वयातून वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
चौकट
जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडे यासाठी ४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यापैकी सुमारे ७५ टक्के म्हणजे ३ कोटी ७१ लाख रुपये संबंधित ग्रामपंचायतींच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित निधी आवश्यक प्रक्रियेनंतर वितरित केला जाणार आहे.
Post Views: 19