सोलापूर : श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजनाचा आढावा घेण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर विनायक कोंड्याल यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. ही बैठक गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी दुपारी ४ वाजता महापौर कार्यालयात होणार आहे.
श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा १८ जुलै ते २० जुलै २०२६ या कालावधीत सोलापुरात मुक्कामी असणार आहे. दरवर्षीप्रमाणे पालखीचे रुपाभवानी चौक येथे आगमन होऊन शहरातील विविध मार्गांवरून पालखीचे प्रस्थान होते. यंदा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथे सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे पालखी मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार पालखी सोहळा रेल्वे स्टेशन मार्ग, पोलीस चौकी, मोदी रेल्वे बंगला, रामवाडी, विष्णू मिल चाळ, डोंणगाव रोड, नागनाथ मंदिर, मरिआई चौक, दमाणी नगर, महापालिकेची सुंदरबाई डागा शाळा या मार्गाने पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.
या बदललेल्या मार्गावरील अडथळे दूर करणे, स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने नियोजन करावे, अशा सूचना महापौरांनी दिल्या आहेत.
या बैठकीस महापालिकेचे पदाधिकारी, संबंधित विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित राहणार असून पालखी सोहळा सुरळीत व भक्तिमय वातावरणात पार पडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
Post Views: 15