जेऊर – पुणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने उजनी जलाशयात झपाटणे वाढ होत आहे.त्यामुळे धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात पाणी उचलण्यासाठी खाली नेलेल्या मोटारी वर घेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. मागील काही दिवसात वजा 26 टक्के वर गेलेले धरण पुणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे झपाट्याने भरत आहे. दौंड वरून येणारा विसर्ग तब्बल दीड लाखांच्या आसपास आहे त्यामुळे धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांना आपले विद्युत पंप, स्टार्टर, पाईप, केबल इत्यादी साहित्य सुरक्षित स्थळी नेण्यासाठी धांदल उडाली आहे.

अचानक आलेल्या पाण्यामुळे उजनी धरण क्षेत्रातील फुगवट्यावर असणाऱ्या उमरड, सोगाव,मांजरगाव,वाशिंबे अशा धरण काठावरील गावातील शेतकऱ्यांना पाणी वाढताक्षणी धावपळ करून पाणीपुरवठा योजनेचे सर्व साहित्य लगबगिने वर काढावे लागत आहे. अचानक वाढत असलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना पाण्यातून विद्युत पंप व इतर साहित्य वर काढण्याची वेळ आली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी उजनी धरण वजा मध्ये जात असल्याने मोठमोठ्या चाऱ्या खोदून पाणी आपल्या पाईपलाईन पर्यंत आणण्याची व्यवस्था एकत्रितपणे केली आहे. या चाऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या मोटारी नेऊन ठेवल्या होत्या आता त्या परत पाणी फुगवट्याच्या कडेला आणून ठेवावे लागत आहेत. गतवर्षी पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने धरण 100% भरून सुद्धा उन्हाळ्यात पाणी पातळी झपाट्याने कमी झाली होती यंदा तरी शेतकऱ्यांवर ती वेळ येऊ नये असे बोलले जात आहे.
Post Views: 6