बार्शी – भारताची वाढती लोकसंख्या आणि वाढते मनुष्यबळ यांना श्रमशक्तीची जोड देऊन विकसनशील भारत निर्माण करण्याची ताकद कामगार वर्ग करु शकतो, असा विश्वास जेष्ठ कामगार नेते व लेखक हरिभाऊ कोळेकर यांनी भारतीय आझाद कामगार महासंघ शाखा महाराष्ट्र यांचेवतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कामगार जागृती आणि कामगार प्रतिष्ठा’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चा सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केला.
या चर्चा सत्राचे अध्यक्षस्थानी भारतीय आझाद कामगार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.प्राचार्य चंद्रहंस गंभीर हे होते.
पुढे बोलताना कोळेकर म्हणाले की, या महासंघाचे कार्य सामाजिक न्याय, प्रतिष्ठा, संरक्षण आणि समग्र कामगार विकासासाठी आहे, जागतिकीकरणाच्या वेगवान प्रकियेमध्ये संघटित आणि असंघटित कामगारवर्ग सुरक्षित, स्थिर आणि स्वास्थ्यासह आनंदी राहिला पाहिजे ही सर्व जबाबदारी आपणा सर्वांची आहे.
या चर्चासत्रात प्रा .डाॅ. रविराज फुरडे, प्रा.डॉ. सुग्रीव गोरे आणि महाराष्ट्र आझाद कामगार महासंघाचे महासचिव
बी.आर. देशमुख यांची भाषणे झाली.
या चर्चासत्रात विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल ॲड.सुधीर थेंबे, आर.टी. माने, साहित्यिक दत्ता गोसावी, प्रकाश गव्हाणे, डाॅ. साक्षी करळे यांचा आणि सेवानिवृत्ती निमित्त राजेंद्र शिंघण यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
तसेच उपस्थित पत्रकार विजय निलाखे, गणेश गोडसे आणि असिफ मुलाणी यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक बी.आर. देशमुख यांनी केले .
अध्यक्षीय भाषणात गंभीर सर म्हणाले की, कामगार चळवळ ही सामाजिक चळवळ झाली पाहिजे, कामगार हा देशाचा कणा आणि अर्थ व्यवस्थेचा मुख्य घटक आहे.
जो समाज कामगारावरील अन्याय उघड्या डोळ्याने पाहतो तो समाज गुलामगिरीतील लोकशाहीमधील बधीर घटक आहे, त्यांची संवेदना जागृत करुन समाज विकासातील सक्रिय घटक बनविणे हा चर्चा सत्राचा मुख्य उद्देश आहे. आभार प्रदीपकुमार कांदे यांनी मानले.
हे चर्चासत्र यशस्वी करणासाठी दिलीपराव साळवे, रामराजे सुर्यवंशी, सौ. वैशाली करळे, सौ.अंजली कांदे, सौ.निता देव यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 13