जालना : जालना शहराचे माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांनी आषाढीच्या
पावन वातावरणात पत्नी सौ.शोभाताई व कन्या नेहा हिच्यासह पंढरपूर येथे
श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.

यावेळी त्यांनी राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि मुक्या
जनावरांच्या कल्याणासाठी श्रीविठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना केली. मागील
पंधरा दिवसांपासून अनेक भागांत समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजा
चिंतेत असून शेतकरी आभाळाकडे आशेने डोळे लावून बसला आहे. वेळेत पाऊस न
पडल्यास शेतकऱ्यांसह मुक्या जनावरांवरही मोठे संकट ओढवू शकते, करिता
“राज्यात भरपूर व समाधानकारक पाऊस पडू दे, शेतकऱ्यांची पिके बहरून येऊ दे
आणि सर्व जनता सुखी, समृद्ध व निरोगी राहू दे,” अशी श्री विठ्ठल चरणी
मनोभावे प्रार्थना केली.






















