बार्शी – बुधवारी दिल्ली येथे आमदार राजाभाऊ राऊत यांनी रस्ते वाहतूक व महामार्ग खात्याचे केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांची भेट घेतली.
यावेळी आमदार राजाभाऊ राऊत यांनी ना. नितीनजी गडकरी यांच्याकडे टेंभुर्णी-कुर्डूवाडी-बार्शी- कुसळंब रा.म.पा.क्र. ५४८सी किमी १५७/३५० ते २३०/१७६ आणि कुसळंब – येडशी – मुरुड – लातूर रा.म.पा.क्र. ६३ किमी ०+५५० ते २०+४६० या मार्गांच्या चौपदरीकरणासाठी डीपीआरला मान्यता देऊन प्रशासकीय मंजुरी देऊन या सोलापूर, धाराशिव व लातूर जिल्ह्यासाठी लाभदायक असणार्या या महत्त्वाकांक्षी रस्त्याचे काम लवकर चालू व्हावे ही मागणी केली.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८सी व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ हे महाराष्ट्रातील विविध महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गांना जोडणारे प्रमुख मार्ग असल्याने भविष्यातील दळणवळण नियोजनाच्या दृष्टीने या प्रकल्पास विशेष महत्व आहे. बार्शी तालुक्यासह सोलापूर,धाराशीव व लातूर जिल्ह्यातील नागरिकांची या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत दीर्घकालीन मागणी असून सदर प्रकल्प मंजूर होणे अत्यावश्यक असल्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी आमदार श्री.राणाजगजितसिंह पाटील, मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते.
ना. नितीनजी गडकरी यांनी संबंधित अधिकार्यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले. रस्त्याच्या कामाला लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करुन प्रत्यक्षात कामास सुरवात होईल, असा शब्द आमदार राजाभाऊ राऊत यांना दिला.