सोलापूर : सोलापूरचा सर्वांगीण विकास हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असून केंद्र शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ शहरवासीयांना मिळावा. त्यासाठी प्रशासनाने गतिमान आणि लोकाभिमुख पद्धतीने काम करावे. शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी स्पष्ट केले.
शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या प्रभावीपणे सोडविण्याच्या दृष्टीने राज्यसभा खा. प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांनी गुरुवारी सोलापूर महानगरपालिकेत विविध विभागांची विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीत शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक सुविधा, पायाभूत विकास तसेच केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीस महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे, नगरसेवक प्रियदर्शन साठे, नगर अभियंता अकुलवार तसेच महानगरपालिकेतील सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये प्रभावी समन्वय ठेवून विकासकामे वेळेत पूर्ण करावीत. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी प्राधान्याने सोडवून प्रत्येक विभागाने नियोजनबद्ध आणि जबाबदारीने काम करावे, असे निर्देश खासदार डॉ. वाघमारे यांनी दिले.
बैठकीतील प्रमुख चर्चेचे मुद्दे :
– नियमित व सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी उपाययोजनांचा आढावा
– प्रलंबित रस्ते, विकासकामे आणि आवश्यक निधीबाबत चर्चा
– शहर स्वच्छता, ड्रेनेज व सांडपाणी प्रकल्पांच्या कामांचा आढावा
– विविध योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर
– नागरिकांना दर्जेदार व वेळेवर सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना
– विकासकामांना गती देण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे निर्देश
Post Views: 9