शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, नवोपक्रम आणि विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोनासाठी ओळखल्या जाणाऱ्या माईर्स एमआयटी शिक्षण समूहाने बार्शी येथे AICTE (अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली) मान्यताप्राप्त नवीन डिप्लोमा अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले आहे. या मान्यतेमुळे बार्शी व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक, उद्योगाभिमुख आणि दर्जेदार तांत्रिक शिक्षणाची नवी दारे खुली झाली आहेत.
गेल्या चार दशकाहून अधिक शैक्षणिक उत्कृष्टतेची समृद्ध परंपरा असलेल्या माईर्स एमआयटी समूह देशभरात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. त्याच परंपरेचा वारसा जपत बार्शीतील हे नवे डिप्लोमा महाविद्यालय विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षणाचा प्रभावी संगम उपलब्ध करून देणार आहे.
महाविद्यालयामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अत्याधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण सुविधा, अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकवर्ग, उद्योग क्षेत्राशी सुसंगत अभ्यासपद्धती आणि कौशल्य विकासावर विशेष भर यामुळे विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्याचे उद्दिष्ट संस्थेने ठेवले आहे. “या नव्या डिप्लोमा महाविद्यालयाच्या स्थापनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व तांत्रिक शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून, यामुळे स्थानिक उद्योग क्षेत्राला कुशल मनुष्यबळ मिळण्यास मदत होईल.” असा विश्वास माईर्स एमआयटी संस्थेच्या विश्वस्त व महासचिव प्रा. स्वाती कराड – चाटे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे यांनी या नवीन डिप्लोमा अभियांत्रिकी महाविद्यालयात “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि उद्योग क्षेत्राशी सुसंगत प्रशिक्षणावर विशेष भर दिला जाणार असून भविष्यात हे महाविद्यालय तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्रात उत्कृष्टतेचे नवे मानदंड प्रस्थापित करेल.” असे मत व्यक्त करत बार्शी व परिसरातील विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन उज्ज्वल करिअरच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्याचे आवाहन केले.
Post Views: 183