सोलापूर – करप्रणालीबाबत जनजागृती वाढविणे, करदात्यांशी विश्वासाचे नाते अधिक दृढ करणे आणि अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये सांघिक भावना विकसित करण्याच्या उद्देशाने सोलापूर येथील आयकर कार्यालयात गुरुवारी १६७ वा आयकर दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त वैभव ढेरे, जीएसटी विभागाचे सहआयुक्त सुधीर चेके उपस्थित होते.
दरम्यान, आयकर विभागाची भूमिका, करदात्यांचा सहभाग आणि पारदर्शक करप्रशासनाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी सनदी लेखापाल संघटनेचे अध्यक्ष नोगजा तसेच आयकर प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष कमलेश नागर यांनीही उपस्थित राहून करदाते, करसल्लागार आणि आयकर विभाग यांच्यात अधिक समन्वय आणि विश्वास निर्माण करण्याची गरज व्यक्त केली.
निमित्ताने बुद्धिबळ, बॅडमिंटन, कॅरम तसेच आयकर विषयक प्रश्नमंजुषा अशा विविध क्रीडा व बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यसंस्कृतीबरोबरच बौद्धिक आणि क्रीडा कौशल्यालाही चालना दिली.
यावेळी आयकर विभागाचे अधिकारी उमेश यादव, विशाल कुमार, शोएब मुजावर आणि मंगल पल्ली यांच्यासह विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच कर क्षेत्राशी संबंधित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयकर दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांमधून करप्रणालीविषयी जागरूकता वाढविण्याबरोबरच करदात्याभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
चौकट
आयकर दिनानिमित्त आयोजित या उपक्रमांमुळे केवळ कर्मचाऱ्यांमधील स्पर्धात्मकता आणि सांघिक भावना वृद्धिंगत झाली नाही, तर करप्रणालीबाबत जनजागृती आणि करदात्यांशी अधिक विश्वासाचे नाते निर्माण करण्याचा संदेशही प्रभावीपणे देण्यात आला.
Post Views: 18