धाराशिव – साप्ताहिक खडतर प्रवासचे संपादक प्रभाकर लोंढे आणि कॅमेरामन यांच्यावर परंडा पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई म्हणजे पत्रकारिता व चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी करणारा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे. त्यामुळे लोंढे यांच्यावर केलेली कारवाई तात्काळ रद्द करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, परंडा तालुक्यातील निजाम जवळा येथील शेतकरी बाबुशा सुपनास पवार यांच्या शेतातील शेड पाडण्यात आल्याच्या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार प्रभाकर लोंढे आणि कॅमेरामन अण्णाभाऊ लोंढे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा. तसेच प्रभाकर लोंढे व अण्णाभाऊ लोंढे हे केवळ बातमी संकलन व वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्यासाठी घटनास्थळी गेले होते. मात्र, “शासकीय कामात अडथळा निर्माण केला” या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून जनहिताच्या विषयांवर माहिती संकलित करून ती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करतात. त्यामुळे केवळ वृत्तांकनासाठी घटनास्थळी उपस्थित राहणे किंवा चित्रीकरण करणे, याचा अर्थ शासकीय कामात अडथळा निर्माण करणे असा होऊ शकत नाही.
या प्रकरणातील कारवाई अन्यायकारक असून ती पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याची भावना पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून लोंढे यांच्या विरोधातील गुन्हा तात्काळ मागे घ्यावा. तसेच पत्रकारांना कर्तव्य बजावताना अनावश्यक त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी केली आहे.
यावर व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, सरचिटणीस आकाश नरोटे, धाराशिव तालुकाध्यक्ष कुंदन शिंदे, डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष जुबेर शेख, प्रसिद्ध प्रमुख अल्ताफ शेख, सलीम पठाण, माजी तालुकाध्यक्ष अमजद सय्यद, सचिन वाघमारे, असिफ मुलाणी, किशोर माळी, ज्योतिराम निमसे, राजू गंगावणे, मुस्तफा पठाण, प्रभाकर लोंढे, प्रकाश लोंढे, कैलास चौधरी, किरण कांबळे, सज्जन यादव, बाळासाहेब माने, उपेंद्र कटके आदींच्या सह्या आहेत.
Post Views: 13