सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या गावपातळीवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाची अंमलबजावणी अद्याप न झाल्याने त्यांच्यात नाराजी वाढत आहे.
जिल्ह्यातील १,०७८ गावांतील पात्र लाभार्थ्यांची नावे सेवा सहकारी संस्था, तलाठी कार्यालये आणि संबंधित बँक शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत. राज्य शासनाने पोर्टलवर नोंद असलेल्या ५९ हजार ८५१ थकीत कर्जदारांपैकी २६ हजार २५३ शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र ठरविले आहे. यापैकी गेल्या दोन दिवसांत ६ हजार ९३८ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) पूर्ण केले असून उर्वरित लाभार्थ्यांनी ३१ जुलैपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार येत्या ४ दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
मात्र, कर्जमाफीचा लाभ वेगाने मिळत असताना वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान अद्याप प्रत्यक्षात मिळालेले नाही. त्यामुळे आर्थिक शिस्त पाळणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा आणि थकीत कर्जदारांना तातडीचा लाभ, अशी विसंगती असल्याची भावना ग्रामीण भागात व्यक्त होत आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही शासनाने तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी आता अधिक जोर धरत आहे.
चौकट
लाभासाठी हे करा
अॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य
आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) पूर्ण करा
३१ जुलैपूर्वी प्रक्रिया पूर्ण करा
सेवा सहकारी संस्था, आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्र किंवा संबंधित बँक शाखेत सुविधा उपलब्ध
चौकट
आधार प्रमाणीकरण पूर्णपणे मोफत
कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण कोणतेही शुल्क न देता पूर्ण करावे. ही सेवा आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्र आणि संबंधित बँक शाखांमध्ये मोफत उपलब्ध असून कोणालाही पैसे देऊ नयेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी केले आहे.
कोट
“पात्र शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी अॅग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीचा लाभ जलदगतीने वितरित करण्यात येईल. आधार प्रमाणीकरणासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
मुकुंद पवार, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर