जालना – शहरातील झोपडपट्टी धारकांना मोजणी प्रमाणपत्र वितरीत होत असतांना पीआर कार्डचे स्वप्न साकार झाल्याचा अजब दावा करत स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या विद्यमान आमदारांनी अगोदर प्रशासकीय कामकाजाचा “नीट” अभ्यास करावा असा खोचक टोला माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंटयाल यांनी नामोल्लेख न करता आ.अर्जुन खोतकर यांना लगावला आहे.
जालन्यातील मुक्तेश्वर लॉन्स येथे रविवारी जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान कार्यक्रमात जालना मनपाच्या महापौर वंदना मगरे यांच्या हस्ते शहरातील झोपडपट्टी भागातील काही रहिवाश्यांना प्रातिनिधिक स्वरूपात जागा मोजणी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. मात्र, विद्यमान आमदारांनी चक्क पीआर कार्ड वाटप केल्याचा कांगावा करत, आपल्या पाठपुराव्याला यश आले असा अजब दावा करून फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्यामुळे माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंटयाल यांनी त्यांचा नामोल्लेख न करता सडकून टीका केली आहे. गोरंटयाल म्हणाले की,जालना शहरात जवळपास ४२ पेक्षा अधिक झोपडपट्ट्या असून त्या ठिकाणी हजारो गरीब कुटुंब मागील अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. घर आहे, पण पीआर कार्ड नसल्यामुळे या सर्वच झोपडपट्ट्या मधील कुटुंबांना सरकारच्या विविध योजनांच्या लाभासह बँक कर्जापासून वंचित रहावे लागते ही बाब आपण स्वतः तसेच माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब पा.दानवे, माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आ. नारायण कुचे,आ.संतोष दानवे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे आदींनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. सर्वच झोपडपट्टी धारकांना त्यांच्या घराचे हक्काचे पीआर कार्ड मिळाले पाहिजे अशी आग्रही भूमिका मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे मांडण्यात आली होती. शिवाय याच अनुषंगाने आपण दि.२५ सप्टेंबर २०२५ रोजी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले होते. विशेष म्हणजे आपण दिलेल्या निवेदनाची तातडीने दखल घेत त्याच निवेदनावर जालन्यातील सर्वच झोपडपट्टी धारकांचे त्वरित सर्वेक्षण सुरू करण्याचे निर्देश मंत्री बावनकुळे यांनी जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या प्रकरणी त्वरित निर्णय घेत जालना मनपाला सर्वेक्षण करण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार जालना मनपाने नागपूर येथील सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या एजन्सीची निवड करून त्यांना दि.१४ ऑक्टोंबर २०२५ रोजी जालन्यातील सर्वच झोपडपट्टी भागातील रहिवाशांचे सर्वेक्षण करण्यासाठी कार्यारंभ आदेश दिल्याचे सांगून माजी आमदार कैलास गोरंटयाल म्हणाले की, या सर्वेक्षणाचा शुभारंभ राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री तथा जालन्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंढे यांच्या हस्ते आणि माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत चंदनझिरा येथे करण्यात आल्याचे नमूद केले. सर्वेक्षणासह जागेची मोजणी पूर्ण झाली असून ज्यांच्या जागेची मोजणी झाली त्यांना जालना मनपातर्फे मोजणी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येत आहे. झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड मिळावे या मागणीसह मुख्यमंत्री, महसूलमंत्री ते प्रशासकीय यंत्रणा अशा सर्व पातळ्यांवर आपण आणि भाजपाच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी पाठपुरावा करून झोपडपट्टी धारकांना त्यांच्या हक्काच्या घराचे पीआर कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले असतांना, आपल्या पाठपुराव्याला यश, झोपडपट्टी धारकांना हक्काचे पीआर कार्ड मिळणार असा करणाऱ्या विद्यमान आमदारांची माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी चांगलीच खिल्ली उडविली आहे.
——————————
चौकट
————
महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीत होणार पीआर कार्डचे वितरण
——————————
शहरातील जवळपास सर्वच झोपडपट्टी भागातील रहिवाशांचे सर्वेक्षण व जागा मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. जागा मोजणी बाबतचा अहवाल जालना मनपातर्फे लवकरच जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी या कार्यालयाकडे सादर करण्यात येणार असल्याचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी सांगितले. या अहवालाची तपासणी केल्यानंतर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी यांच्या मान्यतेनंतर तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी जालना या कार्यालयामार्फत पीआर कार्ड तयार करण्यात येणार असून सदर पीआर कार्ड तयार झाल्यानंतर जालना मनपातर्फे व्यापक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आणि माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे, आ.संतोष दानवे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झोपडपट्टी धारकांना पीआर कार्डचे अधिकृतपणे वाटप करण्यात येणार असल्याचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी सांगितले.


















