माढा : सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी माढ्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे यांनी माढा तहसील ऑफिस समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. पाटबंधारे विभाग सोलापूरचे कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी आंदोलकांना १७ ऑगस्टला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले असल्याने ते आंदोलन २० ऑगस्ट पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे.
कानडे यांनी ३० जुलै रोजी भीमा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन मनकर्णा ओढ्यांमध्ये सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडल्यास चिंचोली, सापटणे (भोसे), शिंदेवाडी, जाधववाडी (मा.), महातपूर, दारफळ, उंदरगाव, रोपळे (खुर्द),उपळाई (बु), विठ्ठलवाडी, लोंढेवाडी,आदी गावांना याचा फायदा होईल माढा शहराच्या पिण्याच्या पाण्याला काहीअंशी मदत होणार असल्याने शिंदेवाडी, वेताळवाडी रणदिवेवाडी अंबुरे तलाव आणि माढा परिसरातील विविध तलाव तातडीने भरावेत,अशीही मागणी केली होती. परंतु पाटबंधारे विभागाकडून १० ऑगस्टपर्यंत पाणी न सोडल्याने कानडे यांनी तहसील कार्यालय समोर सोमवारी अन्न त्याग आंदोलनाला सुरुवात केली होती. त्या आंदोलनाला टेंभुर्णीचे उपविभागीय अभियंता मंजुनाथ तुंबळ यांनी भेट देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली.परंतु आंदोलकांनी उपोषण सोडण्यास नकार देत सोलापूरचे कार्यकारी अभियंता यांना या स्थळी बोलून लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. त्यानुसार कार्यकारी अभियंता सचिन पवार व तहसीलदार संजय भोसले यांनी त्या ठिकाणी येऊन १७ ऑगस्ट रोजी मागणीनुसार पाणी सोडण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आनंदराव कानडे यांनी उपोषण तात्पुरते स्थगित करत असल्याचे घोषित केले.
या आंदोलनाला माढ्यातील आरपीआय गट, वेताळवाडी ग्रामपंचायत, जाधववाडी ग्रामपंचायत,माढा मुस्लिम संघटना, डॉक्टर असोसिएशन,माढा शहर मनसे आदी संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला.
यावेळी गुरुराज कानडे , शंभू साठे, शरद भांगे,आबा साठे, तानाजी जाधव, सुधीर सुरवसे, अनिल लोंढे, सोमनाथ राऊत,अनिल शिंदे, दत्तात्रय अंबुरे,अक्षय खारे यांसह संघर्ष समितीचे सदस्य माढ्यासह परिसरातील गावचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट…..
निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजाला अनेक वेळा संकटाचा सामना करावा लागतो यावर्षी माढा व परिसरात पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. त्यामुळे अनेक गावच्या लोकांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी हाल सोसावे लागत आहेत. पुणे व परिसरात पडलेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण क्षमतेने भरले असल्याने सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील गावाना पाणी सोडण्यासाठी मी मागणी केली होती. त्या मागणीला पाटबंधारे प्रशासनाने १७ ऑगस्टला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनावर मी विश्वास ठेवून हे अन्नत्याग आंदोलन २० ऑगस्ट पर्यंत तात्पुरते स्थगित करत आहे. पाटबंधारे विभागाने त्यांचा शब्द न पाळल्यास पुढील काळात आम्ही शेतकरी पाण्यासाठी तीव्र आंदोलन करणार आहोत. तसेच मनकर्णा ओढा उपळाई व बेंद ओढ्याला कॅनॉलचा दर्जा देण्यासाठी शासन दरबारी प्रस्ताव पाठवण्यास अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवली आहे.
आनंदराव कानडे
माजी जिल्हा परिषद सदस्य (आंदोलक)