सांगोला – सांगोला तालुक्यातील वाडेगाव येथील माण, कोरडा व अफ्रुका या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर श्रावण सोमवारच्या शुभ मुहूर्तावर शिवशंकर मूर्तीची स्थापना माणगंगा भ्रमणसेवा संस्था व अनेक मान्यवरांच्या सहभागातून करण्यात आली. मूर्तीसाठी लागणारा चबुतरा संगमाच्या बेटावर तयार करुन लोकसहभागतून वृक्ष लागवडीसह निसर्गरम्य स्थळांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच बाळासाहेब लोकरे यांनी स्वखर्चाने शिवमुर्ती तयार करून अर्पण केली. ही दोन्ही कामे गेल्या सहा महिन्यापासून सुरू होती. मूर्ती घडवण्याचे काम पंढरपूरचे मूर्तिकार विकी परदेशी व त्यांच्या सहकार्यानी पूर्ण केले. दिपक बंदरे व अशोक देवांशी यांच्या हस्ते पूजन करून पंढरपुरातून शिवमूर्तीचे प्रस्थान झाले. श्रावण सोमवार दि.२४ ऑगस्ट रोजी अनेक मान्यवरांच्या हस्ते मूर्तीचे पूजन करण्यात आले. वाद्यवृंद, भजनी मंडळ, शंभू महादेवाच्या मानाची कावड, जलकुंभधारी महिला व अनेक भाविकांच्या सहभागाने गावातून मूर्तीची मिरवणूक काढून हरहर महादेव अशा जयघोषत मूर्ती त्रिवेणी संगमावर नेण्यात आली. चार टनाहून अधिक वजन असल्याने मूर्तीची वाहतूक करणे व ती चबुतऱ्यावर बसवणे अत्यंत अवघड काम असूनही माऊली चव्हाण, श्रीकांत माने, संजय हजारे यांनी कुशलतेने पार पाडले. मूर्तीचे पूजन व धार्मिक विधी महादेव स्वामी, रवींद्र स्वामी, विश्वंभर स्वामी यांनी पार पाडले. पूजा, आरती झाल्यानंतर उपवासाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी हजारो भाविक सहभागी झाले होते.
चौकट –
या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम रविवार दि.३० ऑगस्ट रोजी स.९.३० वा. मठाधिपती शिवाचार्य मुक्तेश्वर महास्वामीजी वेळापूरकर यांच्या मंत्र उपचाराने होणार असल्याची माहिती वैजिनाथ घोंगडे यांनी दिली. या कार्यक्रमात सर्व भाविक भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.