पंढरपूर – प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरात बुधवारी मुस्लिम बांधवांच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पुढाकाराने शोभायात्रेत सहभागी नागरिकांना खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी शोभायात्रेत सहभागी होऊन मुस्लिम बांधवांना ईद मिलाद-उन-नबीच्या शुभेच्छा दिल्या.
शोभायात्रेच्या निमित्ताने शहरातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते.
प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरात मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद मिलाद-उन-नबी सण मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मुस्लिम समाजातील लहान मुले, पुरुष तसेच युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
ईद मिलाद-उन-नबी हा प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सवाच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा महत्त्वाचा सण आहे. त्यांच्या शिकवणी नुसार प्रेम, शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उत्सवाच्या माध्यमातून केला जातो. पंढरपुरातही याच भावनेतून मुस्लिम बांधवांनी उत्साहात हा सण साजरा केला.
या निमित्ताने मुस्लिम बांधवांकडून मशिदींची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि परस्पर स्नेहाचा संदेश देत हा उत्सव उत्साहात पार पडला.
—————
चौकट -(पुढे शोभायात्रा मागे स्वच्छता; मुस्लिम बांधवांकडून स्वच्छतेचा संदेश)
पंढरपूर शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत मिरवणुकी मागे मुस्लिम बांधवांनी स्वच्छता मोहीम राबवली होती. या स्वच्छता पथकात मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सामील होऊन सहभाग नोंदवला. या स्वच्छता मोहिमेमुळे निवडणुकीनंतरही सर्वत्र स्वच्छ पहावयास मिळाली.
Post Views: 35