सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समिती बांधकाम विभागात बीडीओंच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदली होऊन एक महिना उलटला तरी शाखा अभियंता विलास कोंडगुळे हे तालुक्यातील विकास कामांचे बिल काढण्याच्या घाईत असून, त्यांना उपअभियंता शरद उंबरजे यांचे उघड पाठबळ मिळत असल्याचा आरोप होत आहे.
पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी असल्याने शाखा अभियंता कोंडगुळे यांची मुख्यालयात बदली झाली आहे. ६ ऑगस्ट रोजी त्यांनी पदभार दिला आहे. असे असतानाही ते मंद्रूपसह तालुक्यातील विविध गावांमधील काँक्रीट रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी सरपंच आणि ठेकेदारांकडे हेलपाटे मारत असल्याची चर्चा आहे.
एक महिना लागणारे काम आठवडा-पंधरा दिवसात उरकून त्यांची मोजमाप पुस्तिका (MB) तयार करून बिले काढण्याचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप आहे.
पदभार दिल्यानंतर मोजमाप पुस्तिका कोणत्या नियमानुसार तयार केली जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. बीडीओंनी कार्यमुक्त करण्यास सांगूनही उपअभियंता उंबरजे त्यांना का पाठीशी घालत आहेत? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
नियमबाह्य पद्धतीने कामे करून बिले काढणारे शाखा अभियंता कोंडगुळे आणि त्यांना पाठबळ देणारे उपअभियंता उंबरजे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
…
बीडीओंनी आदेश देऊनही दुर्लक्ष
…
या संदर्भात दक्षिणचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी उपअभियंता उंबरजे यांना कोंडगुळे यांच्याकडील मोजमाप पुस्तिका बंद करून त्यांना मुख्यालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाला दोन आठवडे उलटले तरी उपअभियंता उंबरजे यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट ते जाणीवपूर्वक कोंडगुळे यांना पाठीशी घालत असल्याची जोरदार चर्चा आहे.
…
कामाच्या गुणवत्तेबाबत संशय
…
सिमेंट काँक्रीट रस्ता पूर्ण होण्यासाठी एक ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र कोंडगुळे यांची बदली झाल्यामुळे घाईघाईत कामे उरकून बिले काढली जात आहेत. त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेबाबत संशय आहे. त्या रस्त्यांची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करावी.
– जावेद आवटे, तालुकाध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा, दक्षिण सोलापूर
Post Views: 5