सोलापूर : अनैतिक संबंधाच्या वादातून लोकमान्यनगर, मजरेवाडी येथे ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी अल्ताफ शेख याचा मारहाणीत खून झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात रात्री उशिरा चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतीन गजनफर शेख (रा. लोकमान्य नगर, सोलापूर), मुसेफ वाहब सय्यद (रा. नई जिंदगी), शोएब वाहब सय्यद (रा. नई जिंदगी), सद्दाम राजु इनामदार (रा. लोकमान्य नगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याप्रकरणी मयताचा भाचा सुफियान इरशाद शेख (वय २२, रा. लोकमान्यनगर, मजरेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
यातील फिर्यादी सुफियान शेखचे त्याच्या गल्लीत राहणाऱ्या यातील आरोपी मतीन शेख याच्या पत्नी सोबत गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. ३० ऑगस्ट रोजी दुपारी प्रकरण मिटवण्याच्या बहाण्याने आरोपी मतीन याने फिर्यादी सुफियानला घरी बोलावले होते. त्याप्रमाणे सुफियान तेथे गेला असता मतीन शेख याने रबरी पाईप आणि लाकडाने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मतीनने फोन करून आपले नातेवाईक सद्दाम राजू इनामदार, मुसेफ वाहब सय्यद आणि शोएब वाहब सय्यद यांना तेथे बोलावून घेतले. सद्दाम याने लोखंडी रॉडने सुफियानच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले, तर मुसेफ आणि शोएब यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यादरम्यान आरडाओरडा ऐकून सुफियानचे मामा अल्ताफ शेख आणि भाऊजी सोहेल शेख हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्ती करायला आले. त्यावेळी आरोपी मुसेफ सय्यद याने सोहेलच्या डोळ्यावर बुक्की मारून त्याला जखमी केले. सोहेलला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या अल्ताफ शेख यांच्या छातीवर मुसेफ याने डाव्या-उजव्या बाजूला जोराने अनेक बुक्या मारल्या. या भीषण मारहाणीमुळे अल्ताफ यांच्या तोंडातून रक्त आले व ते जागीच कोसळले. नातेवाईकांनी अल्ताफ शेख आणि जखमी सुफियान यांना येथील शासकीय शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून अल्ताफ शेख यांना मृत घोषित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी मतीनला रात्रीच अटक केली आहे. त्याला आज सोमवारी दुपारी येथील न्यायालयात हजर केले असता त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेची आणि पोलिसांची पथके रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलीस निरीक्षक सुशांत वराळे हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
चौकट – सर्व आरोपींच्या अटकेसाठी पी एम रूम बाहेर नातेवाईकांचा ठिय्या
गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक होईपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मृताच्या नातेवाईकांनी घेऊन पीएम रूम बाहेर या मांडला होता. त्यामुळे विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सुहास वराळे व अन्य अधिकाऱ्यांनी लवकर कारवाई करण्याचे अश्वासन दिल्यानंतर सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
Post Views: 4