सोलापूर – अंगणवाडी केंद्रांना विविध खर्चासाठी मिळणाऱ्या निधीच्या व्यवहारात आता बदल करण्यात आला आहे. यापुढे हा निधी अंगणवाडी सेविकांच्या वैयक्तिक अथवा स्वतंत्र खात्यावर जमा न करता संबंधित अंगणवाडी केंद्राच्या नावाने उघडण्यात आलेल्या स्वतंत्र बचत खात्यात जमा केला जाणार आहे. त्यामुळे निधी नेमका कुठे आणि किती खर्च झाला, याची तपासणी करणे अधिक सुलभ होणार असून आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
महिला व बालकल्याण विभागाने जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. प्रत्येक अंगणवाडी केंद्रासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत स्वतंत्र बचत खाते उघडणे बंधनकारक करण्यात आले आहे. या खात्याची पासबुकधारक अथवा अधिकृत खातेदार म्हणून संबंधित अंगणवाडी सेविकेची नोंद केली जाणार आहे.
केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत समुदाय आधारित कार्यक्रम, प्रशासकीय खर्च, अंगणवाडी इमारतीचे भाडे आदींसाठी केंद्र व राज्य शासनाचा निधी उपलब्ध होतो. सध्या हा निधी जिल्हा स्तरावरून प्रकल्प स्तरावर आणि त्यानंतर अंगणवाडी सेविकेच्या स्वतंत्र बँक खात्यात वर्ग केला जातो. मात्र, निधीचा वापर करताना केंद्रनिहाय आर्थिक व्यवहार स्पष्टपणे दिसावेत आणि खर्चाची पडताळणी अधिक प्रभावीपणे करता यावी, यासाठी आता स्वतंत्र खाते पद्धती लागू करण्यात येत आहे.
चौकट
केंद्राच्या खात्यातच निधी; खर्चाची पडताळणी सोपी
अंगणवाडी केंद्राच्या नावाने खाते सुरू झाल्यानंतर प्रशासकीय खर्च आणि इमारत भाड्यासह संबंधित निधी थेट या खात्यात वर्ग केला जाणार आहे. त्यामुळे उपलब्ध निधी, झालेला खर्च आणि शिल्लक रक्कम याचा केंद्रनिहाय हिशेब ठेवणे सोपे होणार आहे. तसेच खर्चाची कागदपत्रे, बँक खात्यातील व्यवहार आणि निधीचा प्रत्यक्ष विनियोग यांचा ताळमेळ तपासता येणार आहे. या निर्णयामुळे निधीचा निर्धारित कारणासाठीच वापर होतो की नाही, यावर प्रकल्प आणि जिल्हास्तरावरून अधिक प्रभावी देखरेख ठेवता येणार आहे. अंगणवाडी केंद्रांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टता आणण्याबरोबरच निधीच्या वापराबाबतची जबाबदारीही अधिक निश्चित होणार आहे.
कोट
सोलापूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांनी स्वतंत्र बचत खाते उघडून त्याची संपूर्ण माहिती ५ सप्टेंबर २०२६पर्यंत जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडे सादर करावी, असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी निर्देशित केले आहे.