सोलापूर – जिल्ह्यातील पशुपालकांना पशुधनाचे संरक्षण मिळावे, तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा प्रभावी लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत ‘पशुधन विमा योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेचा पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले.
जिल्हा परिषद सोलापूर येथील पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीची मासिक सभा बुधवारी (दि. ९) सभापती रामप्पा चंद्रशेखर चिवडशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजाचा विविध अंगांनी आढावा घेण्यात आला.
सभेत वैयक्तिक लाभाच्या विविध योजना, सुरू असलेली बांधकामे तसेच जिल्ह्यातील दूध संकलनाची सद्यस्थिती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. योजनांची अंमलबजावणी करताना पात्र लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळावा आणि विभागाच्या योजनांची माहिती ग्रामीण भागातील पशुपालकांपर्यंत पोहोचावी, यावरही भर देण्यात आला.
पशुधन विम्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राज्यात ‘पशुधन विमा योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेचे अर्ज उपलब्ध झाल्यानंतर पशुपालकांनी आपल्या जनावरांचा विमा काढण्यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. तसेच संबंधित तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क करून योजनेची माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे साधन असून, जनावरांचा आजार किंवा अन्य कारणांमुळे होणारा मृत्यू यामुळे पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे उपलब्ध विमा योजनेचा लाभ घेऊन पशुधनाला आर्थिक संरक्षण देणे उपयुक्त ठरणार आहे.
या सभेस विषय समितीचे सदस्य, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. व्ही. डी. येवले, सर्व तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी, पंचायत समिती, बांधकाम विभाग १ व २ चे प्रतिनिधी तसेच जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.























