बार्शी – शहरातील लोखंड गल्ली येथे दहीहंडी उत्सवादरम्यान सार्वजनिक रस्त्यावर अर्ध्याहून अधिक भाग व्यापून मांडव व बांबू बांधल्यामुळे वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण केला. याप्रकरणी नियमांचे उल्लंघन करुन नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याबद्दल तिरुपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय गोपी चव्हाण व मंडप मालकावर बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोखंड गल्ली परिसरात तिरुपती प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी रस्त्यावरच स्टेज उभारण्यात आला होता व उरलेल्या रस्त्यावर लाकडी बांबू आडवे बांधून रस्ता अडवण्यात आला होता. यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना व पादचाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण झाला, तसेच नागरिकांच्या जिवाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला.
पोलिसांनी कार्यक्रमापूर्वीच आयोजकांना सार्वजनिक रस्त्याचा एकतृतीयांश भाग वापरावा आणि वाहतुकीस अडथळा आणू नये, अशी कलम १६८ अंतर्गत नोटीस दिली होती.
मात्र, या सूचनांचे उल्लंघन करण्यात आल्याचे गस्तीवर असलेले गुप्तवार्ता पोलीस अंमलदार कदर सायबा तांबोळी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी पोलीस अंमलदार तांबोळी यांच्या फिर्यादीवरुन आयोजकावर गुन्हा नोंदवण्यात आला.
Post Views: 8