बार्शी – तालुक्यातील रस्तापूर गावात रविवारी रात्री हनुमान मंदिर कट्ट्याजवळ एका युवक व त्याच्या आईवर लोखंडी रॉड, साखळी आणि काठीने हल्ला झाला. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी ऋषीकेश सुरेश मोहिते (वय २१, शेतकरी, रा. रस्तापूर) यांच्या म्हणण्यानुसार, ते मंदिर कट्ट्याजवळ उभे असताना ओंकार रामलिंग बरबडे काळ्या स्कॉर्पिओ गाडीत (क्रमांक एमएच २४ एएफ ३३३३) आले. गाडीतून ओंकार बरबडे, संदीप बिरमल मोहिते, किरण बिरमल मोहिते, परमेश्वर जयराम पालकर, सुरज हरिचंद्र देशमुख आणि विशाल बापुसाहेब बरबडे उतरले. त्यांनी फिर्यादीला गाडी काढण्याची मागणी केली. फिर्यादीने चावी नसल्याचे सांगितले असता आरोपींनी गैरकायदेशीर मंडळी जमवली.
ओंकार बरबडे यांनी “तुला लई माज आला आहे” असे म्हणत लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर वार केला. घरातील लोक सोडविण्यास आले असता किरण मोहिते यांनी साखळीने डोक्यात मारले. संदीप मोहिते यांनी फिर्यादीच्या आई ललिता मोहिते यांना “महतारे तु मध्ये येऊ नकोस” असे म्हणत उजव्या हाताच्या पोटरीवर वार केला. परमेश्वर पालकर, सुरज देशमुख, विशाल बरबडे, अक्षय संतोष बरबडे व इतर साथीदारांनी शिवीगाळ, दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. गावातील लोकांनी मध्यस्थी केल्यानंतर आरोपींनी “ओंकार शेटचा नाद केला तर लय महाग पडेल” अशी धमकी दिली. पोलिसांची माहिती मिळाल्यावर आरोपींनी फिर्यादीच्या खिशातून २२०० रुपये काढून घेतले व गाडीत बसून निघून गेले.
हल्ल्यात फिर्यादी व त्यांची आई ललिता मोहिते जखमी झाले. उपचार जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी येथे सुरु असून सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
Post Views: 12