सोलापूर : कानठळ्या बसवणाऱ्या डीजेच्या आवाजाला फाटा देत ढोल-ताशाच्या गजरात, लेझीम आणि झांज पथकांच्या तालावर सुमारे १५० गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तीभावाने निरोप दिला. सलग १७ तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीची विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी तलावात गणेश मूर्ती विसर्जनाने शांततेत सांगता झाली.
लष्कर मध्यवर्ती मानाच्या गणपतीची खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या हस्ते आणि पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ९ वाजता लष्कर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळातील लोधी समाजाचा मानाचा गणपती असलेल्या जय तिरुपती क्रीडा सेवा मंडळाच्या श्रींची पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते विधिवत पूजा व आरती करण्यात आली. याप्रसंगी पोलीस उपायुक्त विजयालक्ष्मी कुरी, सदर बाझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित लाकडे यांच्यासह मंडळाचे संस्थापक प्रकाश पारसकर, देवेंद्र भंडारे, लक्ष्मणसिंग बंबईवाले, अब्राहम कुमार, अध्यक्ष अशोकसिंग बोकेवाले, सचिव नागेश म्हेत्रे, खजिनदार सुरेंद्र शिवसिंगवाले, माजी अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत, सागर शिंगे, नगरसेवक भारतसिंग बडूरवाले, रवीसिंग कयावाले, राजेश कजाकवले, सज्जन सर, नरसिंह आसादे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नळ बाजार चौकातून मिरवणुकीला सुरुवात झाली. पुढे महावीर चौक, कुंभार गल्ली, मौलाली चौक, जगदंबा चौक आणि सात रस्ता मार्गे मिरवणुका विजापूर रोडकडे मार्गस्थ झाला. मिरवणुकीतील मानाच्या जय तिरुपती क्रीडा सेवा मंडळाच्या गणेशाचे विसर्जन रात्री साडेआठ वाजता झाले. तर सर्वात शेवटी रात्री पावणे दोन वाजता अन्नदाता गणेश तरुण मंडळाने बाप्पाचे विसर्जन केले. विशेष म्हणजे, मिरवणुका सुरू असूनही रात्री १२ वाजता न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व मंडळांनी तत्काळ वाद्ये बंद करून कायद्याचा सन्मान राखला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वतः पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी मौलाली चौक, जगदंबा चौक व सात रस्ता परिसरात भेटी देऊन पाहणी केली. मध्यवर्ती महामंडळाने सर्व नियमांचे काटेकोर पालन करत ‘डीजे मुक्त’ गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल आणि प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल पोलिसांकडून गणेश मंडळांचे विशेष कौतुक करण्यात आले.
पालकमंत्र्यांसह मान्यवरांच्या भेटी
यंदाच्या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण पारंपरिक वाद्ये ठरली. लेझीम, ढोल-ताशा, झांज पथके आणि विविध पारंपरिक नृत्यांच्या सादरीकरणाने सोलापूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हा नयनरम्य सोहळा अनुभवण्यासाठी दुतर्फा प्रचंड गर्दी उसळली होती. यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा सहभाग लक्षणीय होता. सात रस्ता येथे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, सभापती निर्मला जंगम, नगरसेविका श्वेता खरात, कल्पना कदम आणि जयश्री फुलारे आदी मान्यवरांनी मध्यवर्ती मंडळांच्या स्वागत कक्षाला भेटी देऊन गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या.
Post Views: 15