जेऊर – महाराष्ट्रात यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होत असल्याने करमाळा तालुक्यासह ग्रामीण भागात ऊस वाहतूकदार आणि कारखाना प्रशासनाची मोठी लगबग सुरू झाली आहे. मात्र, यंदाच्या हंगामावर दुष्काळाचे मोठे सावट असल्याने केवळ तीन महिनेच कारखाने चालण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे ऊस वाहतूकदार कमालीचे अडचणीत सापडले आहेत.
वाहन दुरुस्ती आणि मजुरांची आणण्याची घाई
हंगाम तोंडावर आल्याने ऊस वाहतूकदारांनी ट्रॅक्टर, ट्रेलर आणि इतर वाहनांच्या दुरुस्तीची कामे वेगाने सुरू केली आहेत. यंदा ऊस तोडणी मजुरांची पळवापळवी होऊ नये, म्हणून अनेक वाहन मालकांनी आगाऊ पैसे (अॅडव्हान्स) देऊन मजुरांना आधीच आपापल्या गावी आणून ठेवले आहे. सध्या गॅरेज आणि वर्कशॉपमध्ये ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
तीन महिन्यांचा हंगाम; ‘अॅडव्हान्स’ फिटण्याची चिंता
दुष्काळामुळे यंदा उसाची वाढ पुरेशी झालेली नाही, परिणामी उसाचे सरासरी उत्पन्न (एव्हरेज) घटणार आहे. नेहमी ५ ते ६ महिने चालणारा हंगाम यंदा केवळ ३ महिन्यांवर (७० ते १०० दिवस) आटोपण्याची चिन्हे आहेत. हंगाम कमी दिवसांचा असल्याने मजुरांना आणि वाहनांना दिलेले अॅडव्हान्स (पैसे) कसे फिटणार, ही सर्वात मोठी डोकेदुखी वाहन मालकांसमोर उभी ठाकली आहे. केवळ कारखान्यांशी असलेली जुनी साखळी (लिंक) तुटू नये आणि व्यवसाय टिकून राहावा, म्हणूनच अनेक वाहतूकदार यंदा नाईलाजाने हा व्यवसाय करत आहेत.
प्रतिक्रिया –
“यंदाचा ऊस हंगाम खूप कमी दिवसांचा आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे हा व्यवसाय पूर्णपणे अडचणीत आला आहे. पण कारखान्यांशी असलेली जुनी साखळी तुटू नये म्हणून आम्ही यंदा काम करत आहोत. आमच्या माध्यमातून अनेक मजुरांना रोजगार मिळतो. या बिकट परिस्थितीत सरकारने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ऊस वाहतूकदारांना आर्थिक मदत करावी.”
— श्रीकांत मारकड, ऊस वाहतूकदार, उमरड (ता. करमाळा)
Post Views: 12