सोलापूर – अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसात ४० ते ५० दिवसांचा खंड पडल्याने खरीप हंगामातील पिकांवर गंभीर परिणाम झाला असून, काही पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आगामी रब्बी हंगामात कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांनी समन्वयाने कार्य करून कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार करावा. ‘More Crop Per Drop’ अर्थात प्रत्येक थेंबातून अधिक उत्पादन हे राष्ट्रीय उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ देणार नाही, असा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. विलास खर्चे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ अंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मुळेगाव प्रक्षेत्रावर आयोजित रब्बी हंगामपूर्व प्रशिक्षण कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या प्रेरणेने आणि संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, शिक्षण संचालक डॉ. सातप्पा खरबडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. शुक्राचार्य भोसले, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. कांंतप्पा खोत,डॉ.नितीनकुमार रणशूर,डॉ.कोळसे, डॉ कांबळे, डॉ. कदम,डॉ पाटील, डॉ.सुनिल कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. खर्चे पुढे म्हणाले की, आगामी रब्बी हंगामात कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी किमान आठ दिवस शेतकऱ्यांसोबत घालवून त्यांना काटेकोर शेतीसाठी प्रोत्साहित करावे. बंदीस्त वाफे तंत्रज्ञान तसेच बीबीएफ तंत्रज्ञान हे हवामान बदलासाठी शेतीचे महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान असून, कमी पावसाच्या परिस्थितीतही पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. शेतकऱ्यांमध्ये गटशेतीचा वाढता पुढाकार मृद व जलसंधारण आणि रब्बी पिकांच्या नियोजनातही दिसून यावा.
‘फुले समृद्ध गाव’ उपक्रमांतर्गत सोलंकरवाडी येथे कमी खर्चात अधिक उत्पादन, एकात्मिक शेती पद्धती, जलसंधारण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आदर्श मॉडेल व्हिलेज विकसित करण्याचे काम सुरू दिलेल्या आहे. यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करावे. या तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी लघु चित्रफीत तयार करून त्यांचा प्रभावी वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शिक्षण संचालक डॉ. सातप्पा खरबडे यांनी विद्यापीठाच्या २७ संशोधन केंद्रे, १७ कृषी विज्ञान केंद्रे आणि ८० महाविद्यालयांच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान विकास व प्रसाराचे कार्य सुरू असल्याचे सांगितले. विद्यापीठ विकसीत संशोधनाचा शेतकऱ्यांना शाश्वत शेतीसाठी निश्चितच लाभ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी मागील वर्षातील अतिवृष्टी आणि चालू वर्षातील पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीसमोर निर्माण झालेल्या आव्हानांचा उल्लेख केला. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत द्राक्षाच्या बेदाणा निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या शेड व यंत्रसामग्रीचा समावेश करण्याबाबत विद्यापीठाने तांत्रिक मार्गदर्शन करावे, अशी विनंती केली.
आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. कांतप्पा खोत यांनी सोलापूर जिल्ह्यात नैसर्गिक शेतीवर आधारित संशोधन तसेच ज्वारी काढणीसाठी यंत्र लवकर उपलब्ध करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यामुळे ज्वारी पिकाच्या क्षेत्रवाढीस चालना मिळू शकेल, असे ते म्हणाले.
कार्यशाळेत विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी रब्बी पिकांच्या उत्पादनवाढीसाठी डॉ. हितेंद्र राजपूत यांनी करडई लागवड तंत्रज्ञान, डॉ. विकास लोंढे यांनी कोरडवाहू शेतीसाठी हवामान आधारित तंत्रज्ञान, तर डॉ. सुनील कदम यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रातील वापर याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कुलगुरू डॉ. खर्चे यांनी बंदिस्त वाफे तयार करण्याचे तसेच ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक, कृषी प्रदर्शनातील स्टॉलना भेट देऊन त्यांनी संशोधन व तंत्रज्ञान प्रसाराच्या उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले.
कार्यशाळेत तुंगत येथील अमोल रणदिवे, मार्डी येथील संतोष तोडकर, बेंबळे येथील श्री. सोमनाथ हुलगे, करकंब येथील सुचिता शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक श्री. सचिन कवटे आणि मिरज येथील महिला शेतकरी सौ. सारिका चव्हाण यांनी आपले शेतीविषयक अनुभव मांडले. महिला शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या अनुषंगाने कार्यशाळेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य ठरले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीनकुमार रणशूर यांनी केले. सध्याच्या हवामान परिस्थितीत कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. सूत्रसंचालन डॉ. सुहास उपाध्ये यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. शशिशेखर खडतरे यांनी केले.
कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर चे सर्व अधिकारी व कर्मचारी, आत्मा सोलापूर, कृषी विभाग सोलापूर, कृषी विज्ञान केंद्र मोहोळ आणि कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यशाळेस शेतकरी, महिला शेतकरी, कृषी अधिकारी, विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरडवाहू शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, पाण्याचे काटेकोर नियोजन आणि विद्यापीठ-कृषी विभाग-शेतकरी यांच्यातील समन्वयातून बदलत्या हवामानातही शाश्वत शेतीचा मार्ग निर्माण करण्याचा निर्धार व संकल्प या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला.
Post Views: 5