सोलापूर – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असून, अभिजात मराठी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे, असे प्रतिपादन उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने आणि विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह २०२६’ निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या अहिल्याभवन, नवीन प्रशासकीय इमारत येथे या सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले.
सकाळच्या सत्रात ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीचे पूजन प्रा. कर्नल प्रकाश महानवर यांच्या हस्ते, तर ग्रंथपूजन प्रा. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. महेश खरात, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते. मराठी राज्य विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे यांनी महाराष्ट्र शासनाची भूमिका स्पष्ट करत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यानंतर ‘अभिजात मराठी अभिमान मराठी या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिवाकर कुलकर्णी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. कर्नल प्रकाश महानवर होते. प्रा. लक्ष्मीकांत दामा यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. दिवाकर कुलकर्णी यांनी मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून सामाजिक समरसता आणि सांस्कृतिक वारशाची वाहक असल्याचे सांगितले. सोलापूर शहरात विविध भाषा बोलल्या जातात. भारतीय विचारांची विविधता हीच भारताची एकता आहे, असे त्यांनी नमूद केले. संतपरंपरा ही लोकशाहीची खरी पायाभूत परंपरा असून, मराठी साहित्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
मराठी भाषा जिवंत आणि समृद्ध ठेवण्यात पत्रकारितेचा मोठा वाटा असल्याचे सांगत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून मराठी भाषेची केलेली सेवा अधोरेखित केली. ग्रामीण तसेच दलित साहित्यामुळे मराठी साहित्यविश्व अधिक समृद्ध झाले आहे. आजच्या तरुण पिढीला मराठीतील शब्दसंपत्तीचा विसर पडता कामा नये असेही त्यांनी नमूद केले.
यानंतर दुपारी ‘अभिजात मराठी सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अभिजात कोसंबी व प्रसन्नजित कोसंबी यांच्या गायनाची मैफल, तसेच नृत्य सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे निवेदन अभिनेते दिगंबर नाईक यांनी केले.
या कार्यक्रमास महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाच्या अधिसभा, व्यवस्थापन परिषद व विद्यापरिषद सदस्य, संचालक, अधिष्ठाता, सांविधिक अधिकारी, विद्यापीठातील विविध संकुलांतील विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसेच महाराष्ट्र शासनाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिचा प्राचीन वारसा, साहित्यिक परंपरा आणि सांस्कृतिक महत्त्व यांचा गौरव करण्याबरोबरच मराठी भाषेविषयी जनमानसातील अभिमान वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमात ११३ पुरस्कारांनी सन्मानित विमलताई माळी यांचा मराठी भाषेवरील प्रेम आणि योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे आणि श्रीमती श्रुती देवळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. केदारनाथ काळवणे यांनी मानले.
Post Views: 27