सोलापूर : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात सुरू असलेल्या विशेष सखोल स्वच्छता मोहिमेत उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर महापालिकेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील आठही झोनमध्ये केलेल्या कारवाईत आतापर्यंत ५० जणांकडून ७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहर स्वच्छतेला बाधा आणणाऱ्यांवर यापुढेही नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदारांच्या सूचनेनुसार तसेच महापौर विनायक कोंड्याल, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे आणि सहायक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली २ ऑक्टोबरपासून पुढील १५ दिवस ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध भागांत व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत घंटागाड्यांमार्फत कचरा संकलन करण्याबरोबरच जेसीबी व डंपरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असलेल्या ठिकाणांची स्वच्छता केली जात आहे. फुटपाथवरील वाढलेले गवत, अनावश्यक झाडेझुडपे आणि अडथळे हटविण्याची कार्यवाहीही महापालिका कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. वारंवार कचरा टाकला जाणाऱ्या ठिकाणी पुन्हा कचरा टाकला जाऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून विशेष देखरेख ठेवण्यात येत आहे.
झोननिहाय कारवाई अशी :
झोन १ मध्ये ७ जणांवर कारवाई करून १,०५० रुपये, झोन २ मध्ये ४ जणांकडून ६०० रुपये, झोन ३ मध्ये ४ जणांकडून ६०० रुपये, झोन ४ मध्ये ३ जणांकडून ४५० रुपये, झोन ५ मध्ये १० जणांकडून १,५०० रुपये, झोन ६ मध्ये ९ जणांकडून १,३५० रुपये, झोन ७ मध्ये ४ जणांकडून ६०० रुपये, तर झोन ८ मध्ये ९ जणांकडून १,३५० रुपये दंड वसूल करण्यात आला.
‘माय सोलापूर’ मोबाईल ॲपवर तक्रार नोंदवावी
महापालिकेने नागरिकांना रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता घंटागाडीमध्येच कचरा देण्याचे आवाहन केले आहे. ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. घंटागाडी नियमित येत नसल्यास संबंधित झोन कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा ‘माय सोलापूर’ मोबाईल ॲपवर तक्रार नोंदवावी, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी स्वच्छता नियमांचे पालन करावे
‘स्वच्छ सोलापूर–सुंदर सोलापूर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वच्छता ही केवळ महापालिकेची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता नियमांचे पालन करून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
——–
Post Views: 22