सोलापूर – संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजवण्यासाठी गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात येणार आहे. ‘स्वच्छता ही सेवा-२०२६’ आणि ‘संकल्प सेवा अभियान’अंतर्गत साबणाने हात धुण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रत्यक्ष कृती व प्रात्यक्षिकांसह जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिले आहेत.
केवळ हात धुण्याचा संदेश देण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता, विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात स्वच्छतेची सवय रुजविण्यावर भर देण्यात येणार आहे. ग्रामपंचायती, शाळा आणि अंगणवाड्यांनी या उपक्रमाचे नियोजन करावे, अशा सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी दिल्या आहेत. तसेच राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे छायाचित्रे आणि व्हिडिओंसह अहवाल सादर करण्याचे निर्देश उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी दिले आहेत.
हात धुण्याची योग्य पद्धतही विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे. स्वच्छ वाहत्या पाण्याने हात ओले करून साबण लावावा. तळवे, हातांची मागील बाजू, बोटांमधील जागा, नखांखालील भाग आणि मनगट किमान २० सेकंद चोळून स्वच्छ धुवावे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने हात धुऊन स्वच्छ टॉवेलने कोरडे करावेत. शाळा आणि अंगणवाड्यांमधून सुरू होणारी ही स्वच्छतेची चळवळ घराघरांत पोहोचवून निरोगी समाजनिर्मितीला हातभार लावण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.
चौकट
२० सेकंद हात धुणे, आजारांपासून संरक्षण
जागतिक हात धुवा दिन २००८ पासून दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. यंदाची संकल्पना ‘हात धुवा नायक व्हा’ अशी आहे. जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुण्यामुळे अतिसार, पोटाचे विकार आणि श्वसनाशी संबंधित अनेक संसर्गांचा धोका कमी होतो.
Post Views: 18