सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील नालेसफाईच्या कामात कथित आर्थिक भ्रष्टाचार झाल्याच्या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
तत्कालीन प्रभारी नगर अभियंता सारिका आकुलवार आणि प्रभारी वरिष्ठ फोरमन गिरीष पुकाळे यांच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी.
रंजीत टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स या मक्तेदारामार्फत करण्यात आलेल्या नालेसफाईच्या कामात मक्तेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमत करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी तक्रारीनंतर महापालिकेने चार अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त केली होती. या चौकशीत एकूण १९ अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळल्याचे जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणातील तत्कालीन प्रभारी नगर अभियंता सारिका आकुलवार आणि प्रभारी वरिष्ठ फोरमन गिरीष पुकाळे यांची राज्य शासनाने नियुक्त केलेल्या पॅनेलमधील निवृत्त उपसचिवांमार्फत पुन्हा चौकशी करण्यात येणार असल्याचे समजले. महापालिकेतील या प्रकरणाची चौकशी शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अतिरिक्त आयुक्तांसह संबंधित दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा निवृत्त उपसचिवांमार्फत चौकशी करण्याऐवजी निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केल्यास ती अधिक निष्पक्ष, पारदर्शक आणि नियमानुसार होईल, असे जाधव यांनी म्हटले आहे. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.
—-