सोलापूर : राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचे अग्रिम अर्थसाहाय्य देण्याच्या निर्णयाबद्दल भाजपच्या सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचे अभिनंदन केले.
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत बँका आणि वित्तीय संस्थांनी कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये, अशी सक्त ताकीद सरकारने दिली आहे. तसेच दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणे, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासारख्या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना आधार मिळेल, असे तडवळकर यांनी सांगितले. पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान योजना, पीकविमा आणि कृषी पंपांना मोफत वीज यांसारख्या योजनांतून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. दुष्काळाच्या संकटात राजकारण न करता विरोधकांनी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कर्नाटक सरकारकडून शेतकऱ्यांची बोळवण
महाराष्ट्रातील महायुती सरकारने पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली असताना कर्नाटकातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांसाठी केवळ अडीच हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकारची मदत दुप्पट असून, काँग्रेसशासित राज्यांनी महाराष्ट्राचा आदर्श घ्यावा, असे तडवळकर म्हणाल्या.
———-
Post Views: 7