सोलापूर – समर्थ सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी रविवारी ३०.८८ टक्के मतदान झाले असून आज मतमोजणी पार पडणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिली आहे.
समर्थ सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण १५ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण १८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. इतर मागास प्रवर्गात रवींद्र गारुडकर, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात महानंद कांबळे आणि भटक्या जाती व विमुक्त प्रवर्गात प्रकाश बंडगर हे तिघे बिनविरोध झाले आहेत. उर्वरित सर्वसाधारण मतदारसंघातील १० जागा व महिला राखीव प्रवर्गातील दोन जागा अशा एकूण १२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
रविवारी एकूण ४ हजार २७७ मतदारांपैकी १ हजार ३२० मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून मतदारांनी निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसून आले.
पंढरपूर येथील मतदान केंद्रावर सर्वाधिक ५८.९९ टक्के मतदान झाले तर सर्वात कोल्हापूर येथील मतदान केंद्रावर १६.६७ टक्के एवढे सर्वात कमी मतदान झाले. ठाणे केंद्रावर ४४.२६ टक्के तर पुणे केंद्रावर २९.५० टक्के मतदानाची नोंद झाली.
सोलापूरमधील वेगवेगळ्या ८ केंद्रांवर सरासरी २७ टक्के ते ३८ टक्के दरम्यान मतदान झाले. यामध्ये केंद्र क्र. २ येथे सर्वाधिक ३७ टक्के तर केंद्र क्र. ५ येथे सर्वात कमी २७.६४ टक्के मतदान झाले. सर्व केंद्रांवर मतदान शांततेत पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिली.
रॉजर्स इंग्लिश मिडीयम स्कूलमधील ८ तर पुणे, ठाणे,पंढरपूर, कोल्हापुरातील प्रत्येकी एक अशा १२ केंद्रावर मतदान पार पडले. यासाठी कार्यालयाकडील 90 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले होते. निवडणुकीचा निकाल आज १९ ऑक्टोबर रोजी लागणार असून मतमोजणी प्रक्रिया सकाळी ८ वाजेपासून डफरीन चौकातील सारस्वत ब्राह्मण समाज मंगल कार्यालय येथे पार पडेल. एकूण 6 टेबलवरून मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणी केंद्रावर मतपेट्या असल्याने दोन सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आरबीआयने निर्बंध टाकलेल्या समर्थ बँक निवडणुकीत सहकार परिवार आणि समर्थ बँक बचाव व विकास पॅनलमध्ये कोण मारणार बाजी याकडे लक्ष लागले आहे.
चौकट
१८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
• सर्वसाधारण प्रतिनिधी मतदार संघ •
• करकमकर किरण तुकाराम
• कामतकर अमित बाळकृष्ण
• खाडिलकर मुरलीधर श्रीकृष्ण
• गोखले श्रीधर वसंत
• चौधरी स्वरूप दिलीप
• झळकीकर संजय नारायण
• दुलंगे दिलीप शिवमुर्ती
• देशपांडे अनिरुद्ध प्रभाकर
• नंदुरकर मिलिंद सत्यबोध
• बागेवाडीकर प्रशांत नरसिंह
• माने युवराज लक्ष्मण
• रेंबसू चंद्रकांत नरसिंगराव
• सिंग ओमप्रकाश सुर्यबक्ष
• सिंग दिव्यांशु राजेंद्रबहादूर
• सिंग राहुल ओमप्रकाश
—
• महिला राखीव प्रतिनिधी मतदार संघ •
• इनामदार सुजाता प्रकाश
• झळकीकर उमा संजय
• सिंग मालती अमरबहादूर
चौकट
असे आहेत मतदान केंद्र आणि झालेले मतदान
मतदान केंद्र क्र – केंद्राचे ठिकाण- एकूण मतदार संख्या – एकूण झालेले मतदान – मतदानाची टक्केवारी
१ – सोलापूर – ४५० – १३५ – ३० टक्के
२ – सोलापूर – ४५० – १४४- ३२ टक्के
३ – सोलापूर – ४५०- ११६- २८ टक्के
४ – सोलापूर – ४५० – १६६- ३६.८९ टक्के
५ – सोलापूर -४५० -१२४ – २७.५६ टक्के
६ – सोलापूर -४५० -१२७ – २८.२२ टक्के
७ – सोलापूर – ४५० – १२१ – २६.८९ टक्के
८ – सोलापूर – ३८० – ११४ – ३० टक्के
९ -पंढरपूर – १३९ – ८२ – ५८.९९ टक्के
१०- कोल्हापूर – ६० – १० – १६.६७ टक्के
११- पुणे – ४१७- १२३ – २९.५० टक्के
१२ -ठाणे – ६१ – २७ – ४४ .२६ टक्के
एकूण – ४,२७७ – १२९९ – ३०.८८ टक्के



















