बार्शी – बार्शी बायपासवरील बीआयटी कॉलेजजवळ भरधाव कारने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात विजय हरिभाऊ तेरकर (वय ३४) यांचा जागीच, तर दुचाकीचालक हनुमंत बारीकराव वांजरखेडे (वय ३०, दोघेही रा. खामसवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास घडला. याप्रकरणी कारचालक माउली शाहुराव कळसे (रा. हनुमंतवाडी, ता. निलंगा, जि. लातूर) याच्याविरुद्ध विजय यांचे काका अरुण पंडीतराव तेरकर यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अरुण तेरकर यांचा पुतण्या विजय हा पुणे येथे पत्नी व मुलासह राहत होता. तो स्वामी समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स येथे मॅनेजर व चालक म्हणून काम करत होता. शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास हनुमंत वांजरखेडे हे दुचाकी (क्र. एमएच २५ बीजी ५८५४) घेऊन अरुण तेरकर यांच्या घरी आले. त्यानंतर विजय आणि हनुमंत हे खामसवाडी येथे देवीच्या यात्रेला जाण्यासाठी निघाले. विजय हा दुचाकीवर मागे बसला होता.
सकाळी ११.३०च्या सुमारास लातूरहून कुर्डुवाडीकडे जाणाऱ्या कारने (क्र. एमएच २४ बीडब्ल्यू २८७२) रस्त्याच्या विरुद्ध बाजूला येऊन कुर्डुवाडीकडून लातूरकडे जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून समजल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अपघातानंतर दोघांनाही बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, विजय यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी हनुमंत यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना त्यांचाही मृत्यू झाला.
कारचालकाने हयगयीने व भरधाव वेगाने वाहन चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत विरुद्ध बाजूला येऊन दुचाकीला धडक दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या अपघातात कार आणि दुचाकीचे मिळून अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Post Views: 9