टेंभुर्णी – शहरातील पुणे–सोलापूर महामार्गावरील कुर्डुवाडी पुलाजवळील सर्व्हिस रोडवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) दुपारी कारवाई करत ५.५२ ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त केला. या कारवाईत अमली पदार्थासह कार, दोन मोबाईल फोन, डिजिटल वजनकाटा, रोख रक्कम आणि प्लास्टिकच्या रिकाम्या पिशव्या असा एकूण ११ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गौतम अजित भोसले (वय ३८, रा. वेणेगाव) याच्याविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास पुणे–सोलापूर महामार्गावरील कुर्डुवाडी पुलाजवळील सर्व्हिस रोडवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. संशयित गौतम भोसले याच्याकडे ५.५२ ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन हा अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत १६ हजार ५०० रुपये किमतीचा मेफेड्रोन, एक लाख २० हजार रुपये किमतीचा मोबाईल, १० हजार रुपये किमतीचा आणखी एक मोबाईल, एक हजार रुपये किमतीचा डिजिटल वजनकाटा, १४ हजार रुपये रोख रक्कम, दहा लाख रुपये किमतीची कार आणि प्लास्टिकच्या रिकाम्या पिशव्या असा एकूण ११ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल बाळराजे घाडगे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मुळे, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण करीत आहेत.
Post Views: 13