वैराग – गुन्ह्याचा तपास व मदत करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने मोठी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या धडक कारवाईमुळे सोलापूर ग्रामीण पोलीस दल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
संदेष कृष्णदेव पवार (पो.ह.क्र. २१८०, नेमणूक – वैराग पोलीस स्टेशन, सोलापूर ग्रामीण) असे लाच प्रकरणी जाळ्यात अडकलेल्या संशयित पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
तक्रारदार हे ३९ वर्षीय शेतकरी असून, त्यांच्या मुलाविरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी आणि कारवाई न करण्यासाठी हवालदार संदेष पवार याने सुरुवातीस तब्बल १ लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार शेतकऱ्याने एवढी मोठी रक्कम देण्यास असमर्थता दाखवल्यानंतर लाचेची रक्कम कमी करून २० हजार रुपये मागण्यात आली. अखेर तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले. परंतु, लाच देण्याची इच्छा नसलेल्या त्रस्त शेतकऱ्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), सोलापूर कार्यालयाशी संपर्क साधून २८ सप्टेंबर २०२६ रोजी अधिकृत तक्रार नोंदवली होती.
अशी झाली पडताळणी आणि सापळा कारवाई:
* पडताळणी: एसीबीच्या पथकाने २८ सप्टेंबर २०२६ रोजी वैराग पोलीस ठाण्यात लाचेच्या मागणीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता, हवालदार संदेष पवार याने तडजोडीअंती १० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
* सापळा व हुकमी चाल: यापूर्वी २८ सप्टेंबर आणि ०९ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचण्यात आला होता. परंतु, आरोपी हवालदार पवार यास तक्रारदार व पंचाबाबत संशय आल्याने त्याने त्यावेळी लाचेची रक्कम स्वीकारली नव्हती. अखेर २८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १४:०० वाजेच्या सुमारास एसीबीच्या पथकाने त्याला अखेर ताब्यात घेतले.
मार्गदर्शन व कारवाई करणारे पथक:
सदर धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (पुणे परिक्षेत्र), अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या थेट नेतृत्वाखाली पार पडली.
सापळा पथकात पोलीस हवालदार सलीम मुल्ला (५५१), संतोष नरोटे (३०), स्वामीराव जाधव (१६१६), पोलीस नाईक/शिपाई गजानन किणगी (९६६), राजू पवार (८६२) आणि चालक पोलीस शिपाई अक्षय श्रीराम (२०२६) यांनी अत्यंत यशस्वीरीत्या सहभाग घेतला.
भ्रष्टाचाराविरुद्धच्या या कठोर आणि धडक कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यातील लाचखोर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.