जेऊर – यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने गणेश करे-पाटील यांच्या पुढाकारातून ‘पाच फुटाचा बच्चन’ या चित्रपटाचे करमाळा येथे मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाला पत्रकार, शिक्षक, व्यापारी, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सामाजिक जाणीव निर्माण करणाऱ्या आणि समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनातून प्रेक्षकांना विचारप्रवृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मनोरंजनासोबतच सामाजिक संदेश देणाऱ्या अशा चित्रपटांचा विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना लाभ व्हावा, या उद्देशाने मोफत चित्रपट प्रदर्शनाचा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी पत्रकार बांधव, शिक्षकवृंद, व्यापारी वर्ग तसेच भाजपाचे नेते विलासराव घुमरे,स्वामी समर्थ देवस्थानचे विश्वस्त भारत शिंदे श्रेणिक खाटेर, मिलिंद फंड, उपसभापती अजित विघ्ने यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हलगीच्या कडकडाटात चित्रपटाच्या कलाकारांचे स्वागत करण्यात आले. मुख्य भूमिकेतील श्रुती मधुदीप गीतकार डॉ. प्रदीप आवटे माधुरी आवटे, श्रीरंजन आवटे आदि यावेळी उपस्थित होते.
किर्तन परंपरेतील बदलते स्वरूप, प्रसिद्धीचा झगमगाट आणि त्यातून मागे पडणारी मूल्य या विषयावर चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. चित्रपट पाहिल्यानंतर पत्रकार तसेच व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करता येते याची जाणीव या चित्रपटातून झाल्याचे उपस्थितांनी यावेळी सांगितले.
युवा पिढीमध्ये वैचारिक जाणीव निर्माण करण्यासाठी असे उपक्रम यापुढेही सातत्याने राबविण्यात येतील असे गणेश करे पाटील यांनी शेवटी सांगितले.यावेळी चित्रपटाचे कलाकार आवर्जून उपस्थित होते.
सामाजिक आणि वैचारिक प्रबोधनाला चालना देणारा हा उपक्रम असल्याने उपस्थितांनी यशकल्याणी सेवाभावी संस्था आणि गणेश करे-पाटील यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
Post Views: 8