बार्शी – माझ्याकडे बघून खुन्नस का देतोस, असे म्हणत झालेल्या वादातून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ब्लेडने पाठीत वार केल्याची घटना बार्शी शहरातील गाडेगाव रोडवरील ख्वाजा नगर परिसरात घडली. याप्रकरणी तैय्यब सुलेमान सय्यद (वय २२, रा. ख्वाजा नगर, गाडेगाव रोड, बार्शी) याने इकबाल दाऊत शेख याच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी तैय्यब सय्यद याच्या जबाबानुसार, गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तो गाडेगाव रोडवरील ख्वाजा नगर परिसरात मते मेडिकलसमोर बसला होता. त्यावेळी त्याच्या ओळखीचा इकबाल दाऊत शेख हा तेथे आला. त्याने फिर्यादीला, ‘माझ्याकडे बघून खुन्नस का देतोस?’ असे विचारत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.श
यावेळी फिर्यादीने शिवीगाळ करू नकोस, असे सांगितले असता आरोपीने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातील ब्लेडने पाठीत वार करून जखमी केले. पुन्हा माझ्या नादी लागल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, अब्रान सय्यद व इतर नागरिकांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले. त्यानंतर जखमी तैय्यब सय्यद याने बार्शी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, बार्शी येथे पाठविले. उपचार घेतल्यानंतर त्याने पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली.या प्रकरणी इकबाल दाऊत शेख याच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ,या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Post Views: 13