पंढरपूर – दिवाळीचा सण अगदी तोंडावर येऊन ठेपल्यामुळे शहरातील किराणा मालाच्या दुकानांमधून सध्या किराणा साहित्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होवू लागलेली आहे. शहरातील बऱ्याच किराणा मालाच्या दुकानदारांनी आपल्या दुकानापुढे मंडप टाकून खास विद्युत रोषणाई देखील केलेली दिसत आहे.
सणांचा राजा म्हणजे दिपावलीचा सण.दिवाळीच्या सणात सगळीकडे गोडधोड खाणे, फराळ आदींची मौजमजा असते. पाहुण्यारावळ्यांची, मित्रपरिवाराची एकमेकांना फराळांसाठीची निमंत्रणे देणे,घेणे सुरु असते. ऐरव्ही वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी,कामानिमित्त असलेले कुटुंबातील सर्व सदस्य देखील दिवाळी सणासाठी आपआपल्या गावी एकत्र येत असतात. त्यामुळे घराघरांमधून खमंग चिवडा,पोहे,चकली,शेव,अनारसे, बेसनलाडू, रवाखवा लाडू, बालुशाही,करंज्या आदी विविध पदार्थ बनविले जात असतात. मात्र हे सर्व करण्यासाठी किराणा साहित्याची आवश्यकता असते.
साधारणपणे दिवाळीच्या अगोदर एक महिन्या पासून स्थानिक किराणा मालाचे दुकानदार शेंगादाणे, डाळी, तेल,तुप, चिरमुरे, साखर, पोहे,रवा, मैदा आदी विविध भागातून घाऊक व्यापाऱ्यांकडून मागवित असतात. या बरोबरच दिवाळी सणासाठी खास सुंगधी उटणे,सुवासिक तेल, वेगवेगळी साबणे, स्प्रे, अत्तर, रांगोळ्या, सुवासिक अगरबत्या,धुप आदींना देखील ग्राहकांकडून खूपच मागणी असते. त्यामुळे याही मालाच्या त्या त्या घाऊक व्यापाऱ्यांकडून अगोदरच आँर्डर्स द्याव्या लागत असतात.
घाऊक बाजारातून कट्यांनी अर्थात पोत्यांनी किराणा माल उपलब्ध झाल्यावर तो स्वच्छ करुन ग्राहकांच्या मागणी प्रमाणे वेगवेगळ्या वजनांची पाकिटे बनवुन ती विक्रीस ठेवण्यात येत असतात. ग्राहक दोन पैसे जास्त द्यावयास तयार असतात मात्र किराणा स्वच्छ, ताजा आणि चांगला तसेज दर्जेदार बघुनच खरेदी करीत असतात. त्यामुळे सणाच्या अगोदरच डाळी, तांदूळ,गहू,रवा,पोहे, चिरमुरे आदी मालांची स्वच्छता करुन त्याचे वेगवेगळ्या वजनांचे पँकेट तयार करुन ठेवलेली असतात. ही सर्व तयारी करुन शहरातील किराणा मालाच्या विक्रीची दुकाने सध्या ग्राहकांना दर्जेदार किराणा माल विक्रीसाठी सज्ज झालेली दिसत आहेत.
दरम्यान सध्या महागाईमुळे शेंगादाणे, साखर, डाळी, तुप, तेल आदींचे भाव गगनाला भिडलेले असले तरी प्रत्येक जण वर्षातून एकदा येणाऱ्या दिवाळी सणाच्या निमित्ताने आपआपल्या घरातून वेगवेगळे पदार्थ तयार करीत असतो. येणाऱ्या आप्तस्वकीय, पै,पाहुण्यांना फराळाची निमंत्रणे देत असतो. दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने सर्व कुटुंब एकत्रित येत असते. त्यामुळे ऐरव्ही पेक्षा या सणाला किराणा मालाला ग्राहकांकडून जादा मागणी असते अशी माहिती येथील किराणा मालाच्या व्यापाऱ्यांनी दिली.
————————
कोट
वर्षातून एकदाच दिवाळीचा सण येतो. महागाई देखील आहे. कुटुंबातील सर्व सदस्य या सणाच्या निमित्तानेच एकत्र येतात. त्यामुळे आनंद, उत्साह वाटतो. लहान मुलांची देखील हौस असते.मित्रमंडळींसाठी गोडधोड फराळाचे पदार्थ करावे लागतात. त्यामुळे इतर सणांपेक्षा या महिन्यात जादा किराणा माल लागतो.
गौरी देशपांडे ( ग्राहक)
———————————
कोट
गेल्या दोन,चार दिवसांपासून दुकानात गर्दी सुरु आहे. सध्या ग्राहक दोन पैसे जास्त द्यावयास तयार असतात. मात्र किराणा माल स्वच्छ, ताजा, दर्जेदार बघुनच खरेदी करतात.
वैभव कौलवार (साईप्रसाद ट्रेडिंग कार्पोरेशन, दुकानाचे मालक)
Post Views: 15