सोलापूर – दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता विलास कोंडगुळे यांची जिल्हा परिषद मुख्यालयात बदली होऊन तब्बल चार महिने उलटले तरी अद्याप त्यांनी पदभार सोडलेला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळेच ते बिंदास्तपणे कामकाज पाहत असून, सहाय्यक अभियंता थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही भारी पडत असल्याची चर्चा सुरू आहे.
दक्षिणचे सभापती संदीप टेळे व बीडिओ मनोज राऊत यांनी कोंडगुळे यांचा पदभार काढून घेण्याचे निर्देश दिले होते. तरीही दक्षिणच्या उपअभियंत्यांकडून पदभार काढण्यास जाणीवपूर्वक चालढकल केली जात असल्याचा आरोप होत आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशाल जैन यांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाच वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. यामध्ये दक्षिण सोलापूर बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता विलास कोंडगुळे यांचाही समावेश होता. त्यांच्या बदलीच्या आदेशाला चार महिने पूर्ण झाले तरी त्यांनी पदभार सोडलेला नाही. उलट, तालुक्यातील विविध विकासकामांचे आराखडे आणि मोजमाप पुस्तिका तयार करण्याच्या प्रक्रियेत ते अद्यापही सक्रिय असल्याचे दिसून येत आहेत.
बदली झालेल्या अधिकाऱ्या कडून पदभार काढून घेण्याची जबाबदारी दक्षिणचे उपअभियंता यांच्यावर आहे. यापूर्वीच विलास कोंडगुळे यांच्या कामकाजाविषयी आणि निकृष्ट कामांच्या आराखड्यांबाबत अनेक तक्रारी असतानाही वरिष्ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.
पदभार न सोडण्याविषयी विचारणा केली असता, “वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पदभार काढणार आहोत,” असे उत्तर उपअभियंत्यांकडून दिले जात आहे. प्रशासनाच्या या टोलवाटोलवीच्या भूमिकेमुळे तक्रारदार आणि नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. बदलीनंतर तयार झालेल्या एमबी आणि विकासकामांच्या आराखड्यांची वरिष्ठ पातळीवरून सखोल तांत्रिक तपासणी करावी, तसेच संबंधित अभियंत्याचा पदभार तात्काळ काढून घ्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
…
बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे पदभार काढावेत
….
दक्षिण सोलापूर बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता विलास कोंडगुळे यांची चार महिन्यांपूर्वी बदली झाली आहे. बदली व त्यांच्या कामकाजाबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर उपअभियंता यांना त्यांचे पदभार काढण्यास सांगितले. वारंवार सांगूनही उपअभियंताकडून त्यांचे पदभार काढण्यात येत नाही. वरिष्ठांनी लक्ष घालून कोंडगुळे यांचे पदभार त्वरित काढावे.
संदीप टेळे, सभापती,
दक्षिण सोलापूर
…
कार्यकारी अभियंत्यांचे मार्गदर्शन घेणार
….
सहाय्यक अभियंता विलास कोंडगुळे यांची जिल्हा परिषद मुख्यालय येथे बदली झाली आहे. त्यांचे पदभार काढण्यासाठी कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शन घेणार आहे. मार्गदर्शन मिळाल्यानंतर त्यांचे पदभार काढण्यात येईल.
विलास लेंगरे, उप अभियंता, बांधकाम विभाग, दक्षिण सोलापूर






















