मंगळवेढा – मंगळवेढा तालुक्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अनिल सावंत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मंगळवेढा तालुक्यात सध्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून हिरवा व सुका चारा उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांसमोर पशुधन जगविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे तालुक्यातील गरजू गावांमध्ये तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात तसेच चारा डेपोच्या माध्यमातून पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच तालुक्यातील अनेक गावांसह वाड्या-वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई जाणवत आहे. काही ठिकाणी टँकर सुरू असले तरी अनेक वस्त्यांवरील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त सर्व गावांमध्ये आणि वाड्या-वस्त्यांमध्ये नियमित टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. त्याचबरोबर पशुधनासाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
दुष्काळामुळे शेतील कामे ठप्प झाल्याने शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला काम मिळत नाही. परिणामी ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन रोजगार हमी योजनेंतर्गत तातडीने कामे सुरू करावीत. यामध्ये शेतरस्ते, पाणंद रस्ते, जलसंधारण, नाला खोलीकरण आणि तलावातील गाळ काढणे यांसारख्या सार्वजनिक विकासकामांना प्राधान्य देऊन स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालक आज मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत शासनाने केवळ कागदोपत्री आढावे न घेता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून मदत पोहोचवावी. चारा, पाणी आणि रोजगार या तीन मूलभूत प्रश्नांवर तातडीने निर्णय घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अनिल सावंत यांनी केले आहे.
Views: 12