माढा : माढा शहरातील ऐतिहासिक कसबा पेठ येथील श्री विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त शनिवारी पहाटे ६ वाजता अत्यंत मंगलमय आणि भक्तीपूर्ण वातावरणात श्री विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली.
माढा तालुक्याचे आमदार अभिजीत पाटील, त्यांच्या पत्नी सौ. जयश्री पाटील आणि त्यांच्या मातोश्री यांच्या शुभहस्ते विधिवत मंत्रोच्चारात ही महापूजा करण्यात आली. यावेळी मंदिर परिसर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि अभंगाच्या सुरात दुमदुमून गेला होता.
दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी एकादशीनिमित्त होणारी ही परंपरागत महापूजा पाहण्यासाठी पहाटे ४ वाजल्यापासूनच भाविकांनी मंदिर परिसरात रांगा लावल्या होत्या. माढा शहरासह ग्रामीण भागातून असंख्य विठ्ठल भक्त दर्शनासाठी दाखल झाले होते. यामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती.
ही महापूजा पार पडावी यासाठी मंदिर समितीने उत्तम नियोजन केले होते. भाविकांना दर्शनासाठी कोणतीही अडचण येऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली होती.
या महापूजा सोहळ्यास माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे, नगरसेविका अर्चना कानडे, माजी नगरसेवक शहाजी साठे, दिनेश जगदाळे, आबा साठे, पुजारी बापू कुंभेकर, आजिनाथ गवळी, गणेश भांगे, देविदास कदम, पांडुरंग पाटील, अक्षय शिंदे, सोमनाथ शिंदे, संभाजी काटे, दशरथ चवरे यांच्यासह माढा परिसरातील असंख्य विठ्ठल भक्त, व्यापारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे यांनी देखील श्री विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेतले.
महापूजेनंतर भाविकांना तीर्थ-प्रसादाचे वाटप करण्यात आले.
Views: 14