बार्शी – शहराचा पाणीपुरवठा सुरळीत कधी होणार? या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीलाच विरोधी नगरसेविका सायरा मुल्ला यांनी विचारलेल्या प्रश्नावरुन सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. बुधवारी दुपारी एक वाजता कै. भाऊसाहेब झाडबुके स्मारक सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत दोन तासात विविध ४८ विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांनी काम पाहिले.
सभेला सुरुवात होण्यापूर्वीच मुल्ला यांनी जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नावर बोलण्याची विनंती केली. त्यावरुन या चर्चेत विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, जोतिर्लिंग कसबे, विद्या बंगाळे, कृष्णराज बारबोले यांच्यासह सत्ताधारी संदेश काकडे, दीपक राऊत, संतोष बारंगुळे, भारत पवार यांच्यात जोरदार चर्चा झाली.
यावेळी विरोधी नगरसेवक नागेश अक्कलकोटे यांनी शहराचा पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होईल असे आश्वासन दिलेले असताना त्यात काहीच फरक पडला नाही यावर प्रशासनाने उत्तर द्यावे, अशी मागणी करताच मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांनी नवीन जलवाहिनी टाकण्याबाबत येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय योजनेची माहिती सभागृहाला दिली.
वसतिगृह शहरातील नगरपरिषदेच्या मालकीच्या गट नंबर ९३१ या भूखंडावर गरिबांच्या मुलांसाठी शासकीय बांधकामासाठी हा भूखंड नाममात्र भाडे तत्त्वावर ३० वर्ष देण्यावर एकमत झाले. या वेळच्या चर्चेतही नागेश अक्कलकोटे आणि संदेश काकडे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.
शहरात विविध प्रभागातील रस्त्यांचे डांबरीकरण करणे, सिमेंट गटारी बांधणे, तसेच दुष्काळाच्या आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर विंधन विहिरी घेऊन तेथे टाक्या बांधणे, शहरातील रस्ते विकसित करणे अशा विविध ४८ विषयांना सभागृहात मंजुरी देण्यात आली. यावेळी उपमुख्याधिकारी विठ्ठल पाटोळे यांच्यासह विभाग प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
याच सभेत नगरपरिषदेतील २९७ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार दिवाळी बोनस देण्यास सभागृहाने मान्यता दिली.
Views: 7