मंगळवेढा – मंगळवेढ्यातील १२ आरोपींना अटक करावी तसेच दाखल करण्यात आलेला खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्यावा, या मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या मंगळवेढा बंदला शहरातील व्यापारी, नागरिक आणि विविध समाजघटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘आम्ही मंगळवेढेकर’ या आवाहनाखाली झालेल्या बंदमुळे शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये दिवसभर शुकशुकाटाचे वातावरण दिसून आले.
बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापारी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदविला. नेहमी गजबजलेल्या बाजारपेठा, चौक आणि प्रमुख रस्त्यांवर नागरिकांची व वाहनांची वर्दळ तुलनेने कमी दिसून आली. आंदोलनकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने प्रशासनाचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधण्याचा प्रयत्न केला.
बाजारपेठांमध्ये बंदचे चित्र
एसटी स्टँड परिसर, दामाजी चौक, शिवप्रेमी चौक, मुरलीधर चौक तसेच शहरातील अन्य व्यापारी भागांमध्ये बहुतांश दुकाने बंद असल्याचे दिसून आले. रस्त्यालगतची अनेक दुकाने शटरबंद ठेवण्यात आली होती. बंदमुळे शहरातील दैनंदिन व्यवहारांवर काही प्रमाणात परिणाम झाला असला तरी परिस्थिती नियंत्रणात व शांततापूर्ण राहिली.
‘आम्ही मंगळवेढेकर’ या भूमिकेतून विविध समाजघटकांतील नागरिकांनी व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी आपापले व्यवहार बंद ठेवले.
शांततेने मागण्यांकडे लक्ष
बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आयोजकांकडून सातत्याने शांततेचे आवाहन करण्यात आले. विविध जाती-धर्मांतील नागरिक एकत्र येऊन आंदोलनात सहभागी झाल्याने शहरातील सामाजिक सलोखा टिकविण्याचा संदेश देण्यात आला.
आंदोलनकर्त्यांनी संबंधित प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच खोटे गुन्हे दाखल करून कोणावरही अन्याय होऊ नये, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. प्रकरणाची सखोल व वस्तुनिष्ठ चौकशी करून न्याय मिळावा, अशी मागणी नागरिकांतून करण्यात आली.
पोलिसांचा बंदोबस्त
बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा तसेच संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्याची माहिती समोर आली नाही. नागरिक, व्यापारी, आंदोलनकर्ते व पोलिस प्रशासन यांनी संयम राखल्याने बंद शांततेत पार पडल्याचे चित्र होते.
शांतता समितीने पुढाकार घ्यावा
सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता समितीने पुढाकार घेऊन सर्व समाजघटकांमध्ये संवाद घडवून आणावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. फिर्यादी, आरोपी, संबंधित व्यक्ती, विविध समाजघटकांचे प्रतिनिधी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधून गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे मत व्यक्त होत आहे.
पोलीस प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया पारदर्शकपणे राबवितानाच शहरातील सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी सर्व संबंधितांशी चर्चा करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. मंगळवेढ्याची एकोपा, बंधुभाव आणि शांततेची परंपरा जपण्यासाठी सर्वांनी संयमाने व जबाबदारीने वागावे, असे आवाहन नागरिकांनी केले आहे.