पंढरपूर – वृध्द आईच्या देखभाल आणि सेवेसाठी ठेवलेल्या एका महिलेनेच चक्क इतर कोणी नसल्याचा फायदा घेत घरातील कपाटातून सुमारे साडेपाच तोळ्यांचा सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज लंपास केल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
या चोरीच्या तपासाची माहिती देताना पंढरपूर शहर पोलिसांनी सांगितले की, चोरीच्या गुन्हयातील फिर्यादी सचिन ज्ञानेश्वर ताठे (रा.जुना कराड नाका, पंढरपूर ) यांनी त्यांचे घरात कपाटामध्ये सोन्याचे दागिने ठेवून कपाटाची चावी ठेवली होती. फिर्यादींनी ठेवलेले ५.५० तोळे वजनाचे सोन्याचे दागीने हे दिनांक २९ जुन २०२६ रोजी सकाळी ०८:३० वा.ते ०८ ऑगस्ट २०२६ रोजीचे सकाळी ०७:३० वा.चे दरम्यान अज्ञात चोरटयाने चोरले या बाबत गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान या गुन्हयाचे तपासकामी पंढरपूर शहर पोलीसांनी तपास पथके तयार करून तपास केला असता, तांत्रीक बाबीचे विश्लेषन करून तसेच गोपनीय बातमीदारकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या गुन्हयाची उकल केली. यामध्ये फिर्यादी सचिन ताठे यांनी त्यांच्या आजारी आईच्या देखभाली करीता वनिता समाधान कांबळे (रा.टाकळीरोड पंढरपूर ) या महिलेस कामावर ठेवले होते. वनिता कांबळे हिचा ताठे यांच्या घरामध्ये वावर असल्याने तिने या गोष्टीचा फायदा घेतला. वनिता हिने ताठे यांच्या संमत्तीवाचून घरातील लपवलेली चावी घेवून कपाट उघडून त्यामधील सुमारे साडेपाच तोळे वजनाच्या सोन्याच्या दागीन्यांची चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
दरम्यान ही कामगिरी पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांचे मार्ग दर्शनाखाली, पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोफौ. सुजित उबाळे, पोहवा.अनिल बनसोडे, अस्लम काझी, सचिन हेंबाडे, गणेश पवार, मोरे तसेच पोकॉ.हर्षद ठाकर, पोशि. शहाजी मंडले, पोकॉ. नवले, तसेच सायबर पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीणचे पोकॉ. प्रविण मेटकरी, यांनी पार पाडली. पुढील तपास पोहेका अनिल बनसोडे हे करीत आहेत.
————————-
चौकट : ( विश्वासात घेवून केली चौकशी )
शहर पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणातील संबंधित महिलेस विश्वासात घेवून तपास केला असता, तिने दागीने चोरल्याचे कबूल करून चोरलेले दागीने आपल्या स्वता:च्या घरात लपवून ठेवले असल्याचे सांगीतले. त्यामुळे पोलिसांनी वनिता कांबळे हिच्या घरातून चोरीस गेलेले दागीने जप्त केले.
Post Views: 11