बार्शी – येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या ‘तुकोबाची पोरं (कटघरा)’ या एकांकिकेने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या प्रतिष्ठित ‘नाट्य परिषद करंडक’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीतील सादरीकरणासाठी हा एकांकिका संघ मुंबईकडे रवाना झाला आहे.
मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे दि.२७ आणि २८ ऑक्टोबर २०२६ रोजी ही अंतिम फेरी पार पडणार आहे. या चुरशीच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातून निवडक १७ संघ सहभागी होणार असून, त्यात बार्शीच्या संघाने स्थान मिळवून तालुक्याच्या वैभवात भर घातली आहे.
सदर एकांकिकेचे लेखन संगीत विभाग प्रमुख डॉ. जयभीम शिंदे यांनी केले असून, दिग्दर्शन महेश क्षिरसागर यांनी केले आहे. एकांकिका संघाचे व्यवस्थापक सहाय्यक म्हणून डॉ. श्रीराम वैद्य आणि प्रा. किशोर गरड हे जबाबदारी सांभाळत आहेत.
अंतिम फेरीसाठी रवाना होणाऱ्या संघाला श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव प्रकाश पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे आणि प्राचार्य डॉ. अब्दुल शेख आदी मान्यवरांनी उपस्थित राहून पुढील घवघवीत यशासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे बार्शी परिसरातून आणि सांस्कृतिक क्षेत्रातून एकांकिका संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Post Views: 11